कुडाळ /-
पणन हंगाम २०२०-२१मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कुडाळ तालुका खरेदी विक्री संघामार्फत शासकीय भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.याचा शुभारंभ आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ खरेदी – विक्री संघ येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांनी भाताची विक्री केली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केले.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात आला होता. .यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रु रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव लागू करण्यात आला आहे. तसेच बोनस स्वरूपात गतवर्षी पेक्षा जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
भात विक्री करताना शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी करून भात विक्री करायची आहे. यासाठी चालु वर्षाचा भात नोंद असलेला सातबारा, मुळ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, संस्थेच्या प्रधान कार्यालय कुडाळ येथे आणुन भात विक्री बाबतची नोंदणी करणे आवश्यक आहे. यात पासबुक वरील बँकेचे नाव, आय.एफ.सी.कोड, खाते क्रमांक, स्पष्ट नमुद करणे आवश्यक आहे. भात खरेदीची रक्कम शासनाकडुन शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. भात खरेदी संस्थेच्या कुडाळ एमआयडीसी येथील गोडावुन येथे सकाळी 10.30 वा ते सायं. 5 वा. या वेळेत करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य संजय पडते,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गंगाराम परब, संचालक बी.बी.सावंत, अरविंद शिरसाट, निलेश तेंडुलकर, चंद्रकांत माधव, उपसभापती जयभारत पालव, जिल्हा बॅक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, शिवाजी घोगळे, तालुकाप्रमुख राजन नाईक, मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष नामदेव गवळी, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, पं.स.कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब, बजाज राईस मिलचे श्री.चव्हाण, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक नंदकुमार करावडे, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे श्री.चौगुले, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, संजय भोगटे, संचालक अशोक सावंत, महेश राऊळ, सतिश साळगांवकर, तुकाराम भोई, वैशाली प्रभू, अनुराधा कांदळगावकर, अशोक पालव, जनार्दन कदम, गटसचिव श्री.लोट, माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, माजी पं.स.सदस्य गंगाराम सडवेलकर, रूपेश पावसकर, सुशिल चिंदरकर, राजू गवंडे आदींसह खरेदी विक्री संघाचे संचालक, विकास सोसायटींचे चेअरमन, सचिव तसेच शेतकरी उपस्थित होते.