मालवण /-
मालवण शहरातील देऊळवाडा येथील राहुल पंढरीनाथ माणगावकर (वय-२५ ) या युवकाने आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अविवाहित असणाऱ्या राहुलने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजलेले नाही.
राहुल माणगावकर हा मालवणातील काही खासगी गाड्यांवर चालक म्हणून कामाला जात असे. देऊळवाडा येथे तो आपल्या आजी समवेत राहत होता. आज सकाळी तो आपल्या मित्रासमवेत रुग्ण घेऊन गोव्याला जाणार होता. त्याची कल्पना त्याने आपल्या मालवणातील नातेवाईकांना दिली होती.
आज सकाळी उठल्यानंतर त्याने आपल्या मालवणातील बहीण आणि भावोजीला फोन लावला होता. त्याचा फोन कट झाल्याने भावोजीने त्याला पुन्हा फोन केला असता तो राहुलने उचलला नाही. त्यामुळे सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान त्याच्या भावजीने घरी धाव घेतली असता त्याने राहत्या खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावल्याचे दिसून आले. राहुल याने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, बाळू नाटेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
या घटनेची माहिती देऊनही पोलिस उशिराने दाखल झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, श्री. नरळे, पोलिस कर्मचारी विलास टेंबुलकर, सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. राहुलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
त्याच्या पश्चात आजी, पाच विवाहित बहिणी, चुलत काका, काकी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page