✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
मळगाव स्थित सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात काही मोजक्याच गाड्या थांबत असल्याने रिक्षा चालक व मालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सावंतवाडी टर्मिनस जाहीर झाले असले तरीही अनेक गाड्यांना येथे थांबेच नसल्यामुळे स्थानिक प्रवाशांना ही कुडाळ येथे जावे लागते. त्यामुळे स्थानकातील रिक्षा व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून सावंतवाडी स्थानकात जास्तीत जास्त रेल्वे गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन रिक्षा व्यवसायिकांनी माजी आमदार राजन तेली यांच्याकडे केले.
सावंतवाडी रोड स्थानक परिसराचे सुशोभीकरण व रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली सावंतवाडी स्थानकात आले होते. यावेळी रिक्षा व्यवसायिकांनी राजन तेली यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी रिक्षाचालक प्रदीप सोनुर्लेकर, भाऊ कांबळी, सहदेव सामंत, श्याम सांगेलकर, दिनेश कुडव, अजित सातार्डेकर आदी उपस्थित होते..
सावंतवाडी रोड स्थानकाचे टर्मिनस मध्ये रूपांतर केल्याची घोषणा करण्यात आली मात्र काम देखील अपूर्णच आहे. टर्मिनस पूर्ण झाले असते तर अनेक गाड्यांना येथे थांबा मिळाला असता ज्यामुळे रिक्षाव्यवसायिकांना चांगला व्यवसाय प्राप्त झाला असता. मात्र, जनशताब्दी, कोकणकन्या, मांडवी, तुतारी व दिवा पेसेंजर यासारख्या काही मोजक्या गाड्या वगळता या स्थानकात गाड्यांना थांबा नसल्यामुळे रिक्षाव्यवसायिक अडचणीत आले आहेत.
यापूर्वी राजधानी एक्सप्रेस, गरिब रथ, मडगांव नागपूर या गाड्यांना येथे थांबा होता मात्र तो देखील आता बंद करण्यात आला आहे. अलीकडेच सुरू झालेल्या वंदे भारत गाडीला देखील या ठिकाणी थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे किमान मंगला, नेत्रावती तसेच मडगांव नागपूर यासारख्या एक्सप्रेस गाड्यांना या ठिकाणी थांबे देण्यात यावेत व टर्मिनस चे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी यावेळी रिक्षा व्यवसायिकांनी केली.
