✍🏼लोकसंवाद /- मालवण.

येथील पालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्यासाठी सध्याच्या युती शासनाने प्रयत्न करावेत. आपल्या कालावधीत योजनेचे काम पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे योजना होण्यासाठी प्रयत्न राहिले पण प्रशासकीय कालावधीत दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

केंद्र शासनाच्या नागरी सुविधा योजना अंतर्गत २००७ मध्ये येथील पालिकेला भुयारी गटर योजना मंजूर करण्यात आली असे असले तरी २००९ मध्ये या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. परंतु काम करताना असे निदर्शनास आले की, या योजनेसाठी वापरण्यात येणारे सिमेंट पाईप योग्य नाहीत. त्यामुळे त्यावेळी सिमेंट पाईप ऐवजी एच डी पी पाईप वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. एच डी पी पाईप वापरण्याच्या बदलामुळे या मंजुरीच्या प्रयत्नात सुमारे २ वर्षाचा कालावधी उलटून गेला आणि प्रत्यक्षात २०१२ मध्ये या कामाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर या कामाला निधी उपलब्ध नसल्याने २०१४ मध्ये हे काम पुन्हा बंद पडले. त्यानंतर २०१६ मध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता पालिकेवर आली. निवडणुकीत भुयारी गटर सुरू करण्याबाबत दिलेल्या आश्वासनानुसार या कामाचा पाठपुरावा सुरू करण्यात आला. शासनाने या योजनेच्या पुढील कामासाठी निधी उपलब्ध नसून पालिकेने कर्ज काढून ही योजना पूर्ण करण्याची सूचना केली. “क” वर्ग पालिकेची उत्पन्नाची स्रोत मर्यादित असल्याने कर्ज काढून ही योजना करणे शक्य नसल्याचे आमच्या वरिष्ठांना निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला आणि या सर्वांच्या सहकार्यातून पालिकेला शासनाकडून सुमारे ८.८७ कोटी एवढा निधी २०१८ मध्ये प्राप्त करून देण्यात आला आणि त्यामुळे कर्जाची नामुष्की टाळण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page