खारेपाटण तालुका होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार – रवींद्र फाटक यांचे आश्वासन.
✍🏼लोकसंवाद /- खारेपाटण.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असणाऱ्या खारेपाटण येथील शिवसेना पक्षकार्यालयाला अगत्याने भेट दिली. यावेळी त्यांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
खारेपाटण पक्षकार्यालयात भेट देऊन फाटक यांनी उपस्थित ग्रामस्थांशी, स्थानिक पदाधिकारी यांच्याशी विकास कामांबाबत चर्चा करत संवाद साधला. यावेळी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने आमदार रवींद्र फाटक यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण करण्यात यावा, या प्रमुख मागणीचे ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
उपस्थितांशी संवाद साधताना फाटक म्हणाले, खारेपाटणच्या विकासाचा बॅकलोक भरून काढू व खारेपाटण तालुका निर्मितीची गेल्या ४० वर्षापासूनची असलेली मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून पूर्ण करू, असे आश्वासन यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी ग्रामस्थांना दिले. तसेच खारेपाटण घोडेपाथर जेटी व काझी वाडी चव्हाटा ब्रिज कामाची माहिती घेत हा बंधारा / ब्रिजचा प्रश्न लवकरच मार्गी लावून लोकांची अडचण सोडविण्यासाठी कायम तत्पर राहू, असे देखील फाटक यांनी सांगितले. यावेळी खारेपाटण संभाजी नगर सर्व्हिस रोड, खारेपाटण घोडे पाथर संरक्षक भिंत, आणि काझी वाडी ते चव्हाटा ब्रीज कम बंधारा या कामांची माहिती घेत पाहणी करीत लवकरच सर्व कामे मार्गी लावण्यात येतील,असा शब्द फाटक यांनी दिला.
