✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

इन्सुली गावकरवाडी येथील तिलारी कॅनलबाजूला असणाऱ्या आंबा, काजू बागायतीला महावितरणच्या पोलवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दीड ते दोन लाखांच नुकसान झाल आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणल्यान अनर्थ टळला. अन्यथा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. दरम्यान, महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत कळवून देखील अद्याप एकही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्यानं बागायतदार प्रमोद केरकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

महावितरणची ३३ केव्ही लाईन येथून गेली आहे. या लाईनचा पोल हा श्री. केरकर यांच्या बागेच्या परिसरात आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास पोलवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मोठा आवाज होऊन आग लागली. या आगीत आंबा, काजूची बहरती कलम खाक होऊन सुमारे दोन ते अडीच लाखांच नुकसान झाले आहे. यात नुकतीच मोहोरलेली आंबा 22, काजू 35, सागवान 25 व कोकमची बागायत जळून खाक झाल्यानं दीड दोन वर्षांच्या मेहनतीनंतर बहरणारी कलम जळून खाक झाल्यानं हळहळ व्यक्त केली आहे. शेजारी राहणाऱ्या मयेकर यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. महावितरणचे बांदा, सावंतवाडी अधिकारी यांना फोन करून देखील अद्याप साधी चौकशी व पहाणी करण्यासाठी कुणीही न आल्यानं तसेच कृषी सहाय्यकांचाही फोन बंद असल्यानं बागायतदार केरकर यांसह ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. आग विझविण्यासाठी काका मयेकर, प्रसाद मयेकर सुलोचना मयेकर, आनंद चराटकर, योगेश केरकर यांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page