बांदा /-
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा-सटमटवाडी येथे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ४ लाख ८० हजार रुपयांच्या दारूसह ६ लाख ५० हजाराची गाडी असा मिळून ११ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अभय नारायण केसरकर (वय ४३ रा. बांदा-देऊळवाडी) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्ग परिसरात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा येथून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला होता. यावेळी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने ही गाडी येताना दिसली. यावेळी त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत सुमारे ४ लाख ८० हजाराची दारू आढळून आली. याप्रकरणी केसरकर याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस हवालदार गुरुनाथ कोयंडे, अनिल धुरी, प्रकाश कदम, प्रवीण वालावलकर, यश आरमारकर, सर्वेश नार्वेकर, चंद्रकांत पालकर, प्रथमेश गावडे या पथकाकडून करण्यात आली.
