आंबोली /-

आंबोली नांगरतास मार्गावर दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात आंबोली सिंधुदुर्ग बँकेचे कर्मचारी निशिकांत पांडुरंग बागडी (४२) हे जागीच ठार झाले आहे. तर चौकुळ शाखेचे व्यवस्थापक संतोष बजरंग शिंदे (३५) रा.आजरा याचे दोन्ही पाय जायबंदी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास नांगरतास-दहीचाव्हाळ येथे घडला.

दरम्यान जखमीसह मृताला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आणण्यात आले आहे. दोघेही आजऱ्याहून आंबोलीला यूटीसाठी येत असताना ही दुर्घटना घडली. तर शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, यातील मृत बागडी आणि शिंदे हे येथे आजरा राहतात. ते नेहमी प्रमाणे आज कामासाठी दुचाकीने आंबोलीच्या दिशेने येत होते. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की श्री. बागडी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिदे यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. अशा अवस्थेत त्या ठिकाणी जमलेल्या काही ग्रामस्थ व प्रवाशांनी त्या दोघांना अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. परंतु बागडी यांचा पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाला, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्यावर आंबोली उपकेंद्राचे पोलिस अधिकारी महेश जाधव आणि आदीती पाटकर यांनी उपचार केले. तर श्री. शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडीकडे पाठविण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा सुरू केला आहे, असे आंबोली दुरक्षेत्रावरुन सांगण्यात आले. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच आंबोली शाखेचे व्यवस्थापक शाम पोकळे यांनी धाव घेवून त्यांना मदतकार्य केले. यावेळी पोलीस दीपक शिंदे, अभिजित कांबळे, संभाजी पाटील उपस्थित होते.

दरम्यान या अपघातात एकाच्या मृत्यूस तर एक गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक प्रकाश सदाशिव कांबळे (वय ३५, रा. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page