सावंतवाडी /-
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी क्षेत्रात नव्यानेच उदयाला आलेली मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही शाखा सुरु करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत संस्थेला तीस जागांच्या तुकडीची मान्यता मिळालेली आहे. याबाबतची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मेकॅट्रॉनिक्स ही अभियांत्रिकीची नवीन शाखा आहे, ज्यामध्ये विविध अभियांत्रिकी विद्याशाखांचे एकत्रिकरण होते. मेकॅट्रॉनिक्स अभियंते अत्याधुनिक यंत्रणांचे डिझाइन अस्तित्वात आणण्यासाठी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा मेळ कॉम्प्युटर प्रोग्रामिंगशी घालतात. उदा. वॉशिंग मशिन्स, स्वयंचलित रोबोटिक असेम्ब्ली लाइन्स, कॅमेरा, लेझर प्रिंटर्स आणि फोटोकॉपिअर्स अशा मेकॅनिकल उपकरणांचे डिझाइन करण्याच्या दृष्टीने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगचा मेळ साधला जातो.
मेकॅट्रॉनिक्स अभियंते सेन्सर्स आणि ऍक्युएटर्सचे डिझाइन करतात. कंट्रोल अल्गोरिदम तयार करतात आणि चॅसिस स्टॅबिलायिझिंग सिस्टीम, अँटी-लॉक ब्रेक्स, इंजिन कंट्रोल युनिट्स, डिस्क ड्राइव्हज्, कॅमेरा, सर्व्हिस व सर्जिकलं रोबोट आणि कृत्रिम हृदये अशा मेकॅनिकल सिस्टीम्सच्या डिझाइनकरिता अत्याधुनिक कार्यकारी साहित्याचा वापर करतात किंवा अशा साहित्याची निर्मिती करतात.
मेकॅट्रॉनिक्सचा उपयोग करण्यात आलेले उत्कृष्ट उदाहरण द्यायचे झाले तर नासाने वापरलेल्या मार्स रोव्हरचे उदाहरण द्यावे लागेल. या उपकरणाने मंगळाच्या पृष्ठभागावरील नमुने आणि छायाचित्रे गोळा केली होती. जर तुम्हाला ऑटोमेशन आणि रोबोटिक्समध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर मेकॅट्रॉनिक्स तुम्हाला त्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
करिअर संधी
मेकॅट्रॉनिक्सचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ऑटोमोबाइल, तेल आणि वायू, खाणकाम, परिवहन, संरक्षण, रोबोटिक्स, एअरोस्पेस आणि एव्हिएशन अशा क्षेत्रांमध्येही त्यांना काम करता येते. विद्यार्थ्यांना नौदल, हवाई दल, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) अशा संस्थांमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना डीआरडीओ, दिल्लीत मानाच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.