मुंबई /-
कोल्हापुरातील शिवसेनेचे पाचही माजी आमदार संपर्काबाहेर
गुवाहाटी :-आशिष जैस्वाल,दीपक केसरकर हे देखील गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. दोन आमदारांसह ते गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.
आशिष जैस्वाल हे शिवसेना पक्षप्रमुख यांचे निकटवर्तीय समजले जातात. कालपासून आशिष जैस्वाल हे नॉट रिचेबल होते. अखेर ते गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार आहे. तर दुसरीकडे दीपक केसरकरही शिंदे गटात सामील झाले आहेत.आशिष जेस्वाल यांना मिळून एकूण चार आमदार गुवाहाटीत दाखल झालेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं शिवसेनेसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे.आपल्यासोबत असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असा दावा आता एकनाथ शिंदे करण्याची शक्यता आहे. चार आमदार वाढल्यानं आता एकनाथ शिंदे यांना मिळणारा शिवसेना आमदारांचा पाठिंबाही वाढलाय.
कोण कोण आलं?
आशिष जैस्वाल यांच्यासह मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर या सर्व आमदारांसह गुवाहाटी इथं पोहोचलेले आहेत. सकाळी साडे नऊ वाजता ते गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले. हे सर्व आमदार गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशिष जैस्वाल गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. काँग्रेसने नेते टक्केमारी मागत असल्याचा कारणाचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र या आरोपांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं ते नाराज असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आता आशिष जैस्वाल,दिपक केसरकर हे गुवाहाटीत दाखल झालेत. शिवाय आपल्यासह आणखी दोघा आमदारांनाही आणलंय.
कोल्हापुरातील शिवसेनेचे पाचही माजी आमदार संपर्काबाहेर
कोल्हापूरचे शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर हे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बंडखोर गटात गेल्याच्या वृत्ताने कोल्हापुरात खळबळ उडाली असताना दुसरीकडे जिल्ह्यातील शिवसेनेचे पाचही माजी आमदार गोवा सहलीवर गेल्याच्या वृत्ताने शिवसेनेला आणखी एक हादरा मिळाला आहे.हे सर्व आमदार शिंदे यांचे समर्थक मानले जात आहेत.प्रकाश आबिटकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सुरतला जाणे पसंत केले आहे.
कोल्हापूरच्या शिवसेनेला हा धक्का असताना दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील सरूडकर, उल्हास पाटील हे पाच माजी आमदार एकाच वेळी गोवा येथे गेले आहेत. गेले दोन दिवस ते तेथे आहेत. यातील क्षीरसागर यांच्या हक्काच्या ‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा मतदारसंघात नुकतीच पोटनिवडणूक झाली. तिथे आघाडीमुळे क्षीरसागर यांच्यावर क काँग्रेसच्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ सोडण्याची वेळ आली. या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाल्यामुळे क्षीरसागर यांचे राजकीय भवितव्यही अडचणीत आलेले आहे. उद्या क्षीरसागरांच्याच न्यायाने शिवसेनेच्या उर्वरित माजी आमदारांनाही त्यांचे हक्काचे मतदारसंघ महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसाठी सोडावे लागण्याची भीती असल्याने हे माजी आमदार अस्वस्थ आहेत.
सत्ता येऊनही कामे होत नाहीत, निधी मिळत नाही, पक्ष नेतृत्वाकडून संवादाचा अभाव आणि सत्तेतील राष्ट्रवादी – काँग्रेसच्या कुरघोड्यांमुळे हे माजी आमदार अगोदरच नाराज आहेत.सध्या त्यांच्या मतदारसंघात अन्य पक्षांचे आमदार आहेत. यामुळे विकासनिधी विद्यमान आमदारांच्या माध्यमातून खर्च होत असतो. हे विद्यमान आमदार जरी आघाडीचा भाग असले तरी ते शिवसेनेचे परंपरागत विरोधक आहेत. यामुळे हे विद्यमान आमदार शिवसेनेच्या माजी आमदारांना विचारातच घेत नाहीत. कुठल्याही कार्यक्रमात सहभागी करून घेत नाहीत. यामुळे मुख्यमंत्री पक्षाचा असूनही मतदारसंघातील प्रभाव टिकवणे शिवसेनेला कठीण जात आहे. त्यांची ही नाराजी वेळोवेळी व्यक्त होत गेली. मात्र यावर उपाय न निघाल्याने हे माजी आमदारही अस्वस्थ होते. यातच शिंदे यांचे बंड झाले असताना पाच माजी आमदार गोव्याच्या सहलीवर गेल्याने या माजी आमदारांच्या भूमिकेवरूनही चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्याकडून शिवसेनेसोबत आहोत असे सांगितले जात असले तरी त्याबाबतचा अधिकृत खुलासा केला नसल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.