जि. प.चे आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द बाबत प्रशासनामार्फत योग्य ती चौकशी होऊन जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय मिळावा – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी- वेंगुर्ला जिल्हा परिषद मध्ये देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार हे राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार देण्यात येतात. त्यामुळे सन २०२० चे सिंधुदुर्ग जि. प.चे आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द करण्याचे कारण काय ? याची प्रशासनामार्फत योग्य ती चौकशी होऊन शिक्षकांवर होणारा अन्याय त्वरित थांबविण्यात यावा व जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय मिळावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सन २००० पासून शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार देत आहे. मात्र २०२० मधील नावे जाहीर करण्याऐवजी आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली. याबाबत जिल्ह्यातील शिक्षक वर्गात कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक तालुक्यातून शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या शिक्षकांमधून हे प्रस्ताव मागविले जातात. गटशिक्षणाधिकारी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवितात. यावर्षी सदर प्रक्रिया शिक्षण विभागातर्फे पूर्ण झाली असून फक्त पुरस्कार जाहीर होण्याची प्रक्रिया बाकी होती.असे असताना वृत्तपत्रातून आदर्श शिक्षक पुरस्कारच रद्द झाल्याची बातमी येते, ही घटना जिल्ह्याला भूषणावह नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याला शैक्षणिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात वेगळी परंपरा लाभली असून, आज देशात योजनांची नावे मोठमोठी ठेवली जातात. मात्र ना शेतकऱ्यांचा सन्मान होतो ना कष्टकऱ्यांचा सन्मान होतो. आता तर शिक्षकांचाही होणारा सन्मान थांबूवून काही लोक वेगळीच परंपरा सुरू करण्याच्या मन:स्थितीत दिसत आहेत.समाजातील जो घटक आदर्श समाज, आदर्श पिढी निर्माण करतो त्या शिक्षकाचाच अपमान होत आहे हे योग्य नाही. जिल्हा परिषद मध्ये देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार हे राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार देण्यात येतात.
त्यामुळे सन२०२० चे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द करण्याचे कारण काय ? याची प्रशासनामार्फत योग्य ती चौकशी होऊन शिक्षकांवर होणारा अन्याय त्वरित थांबविण्यात यावा व जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय मिळावा, अशी मागणी एम.के.गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.