कुडाळ/-
कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एन एस एस मार्फत दत्तगाव पिंगुळी येथे नुकताच वनराई बंधारा बांधून जलसाक्षरतेचा एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वयंसेवकांसाठी सात दिवसाचे निवासी श्रमसंस्कार शिबीर आयोजित करणे गरजेचे असते. त्याचा एक भाग म्हणून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या एस एस विभागातर्फे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व प्राचार्य अरुण मर्गज यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंगुळी सरपंच सौ निर्मला पालकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक भवनाच्या परिसरामध्ये निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याअंतर्गत पिंगुळीच्या सरपंच सौ निर्मला पालकर, तेथील कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने पिंगुळी येथे साई मंदिर नजीक भंगसाळ नदी वर पाण्याचा साठा होण्याच्या दृष्टीने वनराई बंधारा बांधण्याचं एक मोलाचे कार्य पार पाडले आहे. पिंगुळी ग्रामस्थांच्यावतीने जो अगोदर बंधारा बांधला होता तो पाण्याच्या ओव्हरफ्लो मुळे खंडित झालेला होता. तो पूर्णत्वाला नेण्याचं काम बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाच्या एन एस एस निवासी श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थिनी केले आहे.पिंगुळी गावासाठी जलस्त्रोत असलेल्या भंगसाळ नदिवर विंधन-उपसा विहिरीसाठी पाण्याचा साठा टिकवून ठेवण्याचे काम या बंधाऱ्यामार्फत केले जाणार आहे . … या उपक्रमा बरोबरच कुडाळ एम.आय.डी.सी. परिसरातील रस्ते सफाई, स्वच्छता इत्यादी कामंसुद्धा शिबिर कालावधीत विद्यार्थिनींनी पार पाडली. पिंगुळीच्या सरपंच सौ. निर्मला पालकर, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य व बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे व समाज सेवेचा वारसा असाच पुढे चालू राहावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या बंधाऱ्यासाठी ग्रामपंचायत सरपंच सौ.निर्मला पालकर, कर्मचारी -संदेश गावडे संतोष पिंगुळकर अप्पा धुरी, कुंभार पवार तसेच प्राचार्य अरुण मर्गज, कार्यक्रम अधिकारी प्राची बर्वे, शामल कुंभार ,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
