कणकवली /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी covid-19 आजाराच्या प्रतिबंधक लसीचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करावा, अन्यथा भविष्यात सिंधुदुर्गात लस कमी पडल्यास लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी वाद होऊन गोंधळ निर्माण होऊ शकतो व यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. असा इशारा कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनात त्यांनी सिंधुदुर्गातील लसीकरणाबाबत सविस्तर वस्तूस्थिती कथन केली आहे. या निवेदनात ते म्हणतात की, सद्या कोविड १९ या साथीच्या आजाराला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी विविध उपाययोजना केंद्र व राज्य सरकार मार्फत आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सद्या ४५ वर्षावरील व्यक्तींना व १ मे २०२१ पासून १८ वर्षावरील व्यक्तींना दोन टप्यात प्रतिबंधात्मक लस देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.