घोषणेला आठ दिवस उलटून देखील प्रशासनाकडून अर्थसहाय्य वाटपाबाबत अद्यापपर्यंत शासन आदेश नाही..
कुडाळ /-
राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव संचारबंदी जाहीर करत असताना मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी नोंदीत बांधकाम कामगार,परवानाधारक रिक्षा व्यावसायिक व घरेलू कामगार यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य देण्याचे दि.13 एप्रिल रोजी जाहीर केले होते.परिणामी ठप्प अर्थव्यवथेमुळे ग्रासलेल्या या वर्गाला थोडासा दिलासा मिळणारा होता. वास्तविक लॉकडाऊन कालावधीसाठी सदरची रक्कम अगदी तुटपुंजी असली तरी आश्वासक सहकार्याची होती या अपेक्षेने कामगार वर्ग,रिक्षा व्यावसायिक यांनी त्याचे स्वागत केले होते. मात्र प्राप्त माहितीनुसार राज्य शासनाने अद्यापपर्यंत सदरची मोबदला रक्कम वितरित करण्यासाठी शासन आदेश,परिपत्रक वा मार्गदर्शक सूचना पारित न केल्यामुळे सदरच्या रक्कमेचा लाभ नेमका कोणत्या पद्धतीने व कधी केला जाणार आहे.
याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय आठ दिवसांचा कालावधी उलटून देखील अद्याप कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून वितरणाबाबत हालचाल नसल्याने लाभार्थी घटकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे कामगार व रिक्षा व्यावसायिक यांचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी याकडे वेळीच लक्ष देऊन अर्थसहाय्य रक्कम जलदगतीने वितरण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून उचित आदेश निर्गमित करावेत व लवकरात लवकर लाभार्थ्यांना रक्कम अदा करावी अशी मागणी मनसेच्या वतीने कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे मीडियाशी बोलताना सांगितले.