स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड झटायचे आहे ! – श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती..
सिंधुदुर्ग / –
पुढील दहा वर्षात एक ही तरुण सुनीते रचणारा नाही झाला तरी चालेल, साहित्य संमेलने नाही झाली तरी चालतील पण दहा-दहा सैनिकांचा वीर चमू आपल्या खांद्यावर बंदुका टाकून राष्ट्राच्या मार्ग मार्गातून, शिबिरा शिबिरातून टपटप करित संचलन करतांना दिसला पाहिजे. राष्ट्राचे संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता असली पाहिजे, असे १९३८ साली मुंबईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून समस्त हिंदू बांधवांना संदेश स्वरूपात सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे समस्त देशभक्तांसाठी आदर्शवत होते. हाच आदर्श समोर ठेवून आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झटायचे आहे, असे प्रतिपादन शुक्रवार, १९ मार्च या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन शौर्य जागृती व्याख्यानावेळी श्री. सुमित सागवेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युगपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या त्यांच्या शौर्यपू्र्ण जीवनाचा इतिहास उपस्थितांना सांगण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विविध गुणांची माहिती उपस्थित युवावर्गाला श्री सुमित सागवेकर यांनी अवगत करून दिली.
श्री.सागवेकर म्हणाले, मार्सेलिस च्या सागरी साहसी उडीने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न प्रथमच जागतिक व्यासपीठावर अतिशय आवेगाने चर्चिला गेला. फ्रान्सच्या भूमीवर सावरकरांना झालेली अटक हा ब्रिटिशांकडून सावरकरांवर झालेला घोर अन्याय आहे, असे मत मार्क्सचा नातू लोंगे याने मांडले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटनने फ्रान्सकडे सुपूर्त करावे या मागणीने जोर धरला आणि तो प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावा लागला. सावरकरांचा अन्याय झाल्याचे न्यायालयाला मान्य करावे लागले आणि त्यामुळे फ्रान्सच्या पंतप्रधानांना त्यागपत्र द्यावे लागले.
क्रांतिकारी देशभक्त, द्रष्टे, प्रतिभासंपन्न असे क्रांतिकारक ज्यांचे नाव भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे असे क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! साहित्यिक आणि क्रांतिकारक अनेक आहेत पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिवीर साहित्यिक एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकरच !
अंदमानच्या कारागृहात जाण्याआधी आपल्या प्रिय पत्नीच्या भेटीच्या वेळी तिच्याशी बोलताना सावरकर म्हणाले होते की, मुला-मुलींची वीण वाढवणे आणि चार काटक्या एकत्र करून घरटे बांधणे याला जर संसार म्हणायचे असेल तर असला संसार चिमण्या कावळे ही करतात. त्यापेक्षा राष्ट्र कार्य केले तर जीवनाला अर्थ आहे.
अशाप्रकारे विविध गुण अंगी असलेले, मृत्यूचे भय ज्यांना कधीच वाटले नाही, मृत्यू हात धुऊन पाठी लागलेला असताना मृत्यूला ज्यांनी मारले आणि अखेर ते मरण पावले असे द्रष्टे, त्याच प्रमाणे हिंदुत्व ज्यांच्या नसानसात भिनलेले होते असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याकडून आदर्श घेऊन आपण सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे झटत राहायचे आहे, असे आवाहन श्री. सुमित सागवेकर यांनी या शौर्य जागृती व्याख्यानाच्या वेळी उपस्थितांना केले.
या व्याख्यानाचा जिल्ह्यातील 50 धर्मप्रेमींनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पुजा मांजरेकर यांनी केले. व्याख्यानाचा उद्देश कु. प्राची शिंत्रे यांनी विशद केला.