सिंधूदुर्गनगरी /-
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांची महाराष्ट्र शासनाने कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली केली आहे. त्यांच्या जागी पालघर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी प्राजित नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ वसेकर यांची राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर बदली झाली आहे. डॉ वसेकर यानी ५ फेब्रूवारी २०२० रोजी सिंधूदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा पदभार स्वीकारला होता. नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. अवघ्या एक वर्ष १९ दिवसामध्ये शासनाने त्यांची बदली केली आहे. डॉ वसेकर यानी पदभार स्वीकारल्यानंतर कोरोनाचा शिरकाव झाला. अजूनही कोरोना सुरुच आहे. अलीकडे काही कालावधीत थोडी शिथिलता आली. त्यामुळे त्यांना विशेष काम करण्याची संधी मिळाली नाही. शासनाने आता त्यांची सम पदावर बदली केली असली तरी ते राज्याचे पद आहे. यापूर्वी असलेल्या विमला या अधिकारी दोन वर्षे जिल्हाधिकारी राहिल्यानंतर ही नियुक्ती मिळाली होती. वसेकर यांना केवळ एक वर्ष सीईओचा कारभार केल्यानंतर शासनाने ही नियुक्ती दिल्याने वसेकर यांना शासनाने एक प्रकार गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे. नवीन येणारे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजित नायर यांची या पदाची पहिली वेळ आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पालघर जिल्ह्यात परिवेक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. तसेच पालघर जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पदाचा प्रकल्प अधिकारी हा पदभार त्यांच्याकडे होता. परिवेक्षाधिन दोन वर्षे सेवा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासनाने त्यांना सिंधूदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती दिली आहे. दरम्यान, डॉ वसेकर यांना कोकण आयुक्त यांच्या समतीने येथील पदाचा पदभार तात्काळ दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देवून नवीन नियुक्ती ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले आहे.