मालवण /-

ढोल -ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि छत्रपतींचा जयघोष करत आज येथील किल्ले सिंधुदुर्गवर भाजपच्यावतीने प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यासह शेकडो शिवप्रेमींनी शिवजयंती थाटामाटात साजरी केली. शिवराजेश्वर मंदिरात जात शिवरायांचे दर्शन घेत त्यांना अभिवादन केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, बाबा परब, सुदेश आचरेकर, महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर, नगरसेविका पूजा सरकारे, रश्मी लुडबे, नगरसेवक आपा लुडबे, विजय केनवडेकर, गणेश कुशे, अशोक तोडणकर, भाऊ सामंत, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, आनंद शिरवलकर, बाळू कुबल आदी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदर जेटी परिसरात दंगा काबू पथक, पोलिस यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आम्ही उत्साहात आणि धुमधडाक्यात शिवजयंती साजरी केली असून आम्हाला कोणतेही सरकार थांबवू शकत नाही. यापुढेही शिवजयंती मरेपर्यंत अशीच साजरी करू. यात राज्य सरकारने आडवे येण्याचा प्रयत्न करू नये. आजचा दिवस हा साऱ्यांच्या दैवताचा दिवस असताना शिवजयंतीला सरकारने १४४ कलम लागू केले ही दुर्दैवी गोष्ट आहे. हा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुख्यमंत्री फक्त प्रशासनाचे प्रमुख असून त्यांनी महाराष्ट्राचा प्रमुख बनण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा यावेळी राणे यांनी दिला.
श्री. राणे म्हणाले, आज राज्यभरात ठिकठिकाणी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. आम्हाला कोणतेही सरकार थांबवू शकत नाही.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातून देऊळवाडा ते बंदर जेटी अशी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. बंदर जेटी येथून बोटीतून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जेटीवर दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषाने आसमंत दणाणून सोडला. त्यानंतर किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात दाखल होत नीलेश राणे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर शिवप्रार्थना म्हणण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page