कोकण मराठी साहित्य परिषद – शाखा मालवण* आयोजित सिंधुसाहित्यसरिता अक्षरगौरव सोहळा कांदळगाव येथे संपन्न.
आचरा /-
को. म. सा. प. मालवण शाखेने नुकतेच ‘सिंधुसाहित्यसरिता’* हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकातील सोळा लेखकांचा तसेच या प्रकाशनासाठी काम केलेल्या सदस्यांचा *‘अक्षरगौरव सोहळा’* को. म. सा. प. मालवण शाखा व कोकण मिडिया यांच्या वतीने कांदळगाव रामेश्वर मंदिर परिसरात श्री. उमेश कोदे यांच्या घरी ‘सिंधुअक्षर नगरीत’ संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान श्री. मंगेश म्हसके, अध्यक्ष को. म. सा. प. सिंधुदुर्ग यांनी भूषविले. यावेळी केंद्रीय सदस्य श्री. रुजारिओ पिंटो, कोकण मिडियाचे श्री. प्रमोद कोनकर, उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, श्री. रविंद्र वराडकर, श्री. माधव गावकर, श्री. रामचंद्र वालावलकर, श्री. राजेंद्र मसुरकर, को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. मंदार सांबारी यांच्या स्वरचित इशस्तवनाने झाली. श्री. माधव गावकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक श्री. सुरेश ठाकूर यांनी केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सहभागी सोळा लेखकांचा *“सिंधुसाहित्यसरिताने मला काय दिले?’ या विषयावर परिसंवाद* आयोजित करण्यात आला. सर्व लेखकांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. तसेच या पुस्तक प्रकाशनामुळे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सन्मानाची भावना मिळाल्याचे सर्वांनीच मनोगतात व्यक्त केले.
सर्व सोळा लेखकांना को.म.सा.प. मालवणच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. *सत्वश्री प्रकाशन* यांच्या वतीने सर्व लेखकांना वाचनीय असे प्रत्येकी पाच अंक श्री. अनिकेत कोनकर यांच्या वतीने भेट देण्यात आले. *“लेखकांनी सिंधुदुर्गातील साहित्यिकांवर सुंदर लेख लिहिले आहेतच. आता त्यांचे चरीत्र लिहिण्याचा संकल्प करा. लेखनातून साहित्य चळवळ समृद्ध करा,”* असे आवाहन श्री. प्रमोद कोनकर यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र मसुरकर यांनीही सिंधुदुर्गातील साहित्यिक चळवळीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. श्री. रामचंद्र आंगणे, श्री. माधव गावकर, श्री. रामचंद्र वालावलकर यांनीही आपल्या भाषणातून सर्वांचे कौतुक केले.
*“मालवण शाखेचे साहित्यिक कार्य उत्कृष्ठ चालू आहे. मधुभाईंना अपेक्षित असलेले काम या शाखेकडून पहायला मिळते, याबद्द्ल सर्वांचे अभिनंदन !”* असे कौतुकोद्गार श्री मंगेश म्हसके, जिल्हाध्यक्ष को.म.सा.प. यांनी काढले.
यावेळी सिंधुसाहित्यसरिता या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे (पुनर्मुद्रण) प्रकाशन जिल्हा अध्यक्ष श्री. मंगेश म्हस्के, सत्वश्री प्रकाशनचे प्रकाशक श्री. प्रमोद कोनकर, श्री.सुरेश ठाकूर व सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
अक्षरगौरव कार्यक्रमाचे संयोजन सौ. अर्चना कोदे व कोमसाप सदस्यांनी केले. सूत्रसंचलन श्री. गुरुनाथ ताम्हणकर केले व आभार सौ. मधुरा माणगावकर यांनी मानले.