मसुरे/-
युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करत भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झालेला आचरा गावचा सुपुत्र चिंदर गावचा रहिवाशी सुब्रमण्य केळकर याना जिल्हा पोलिस अधिक्षक या पदासाठी तामिळनाडू राज्य मिळाले आहे. एकूण दोन वर्षांचा त्यांचा प्रशिक्षण कालावधी असणार असून त्यापैकी पहिले अकरा महिने हैद्राबाद येथे प्रशिक्षण होणार असल्याची महिती सुब्रमण्य केळकर यांनी दै. प्रहारला दिली आहे. हैद्राबाद येथील प्रशिक्षणा दरम्यान तामिळ भाषा सुद्धा त्यांना शिकविली जाणार असून तेथील ट्रेनिंग संपल्यावर सहा महिन्या साठी ते तामिळनाडू येथे नेमणूक दिलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोबेशन कालावधी पूर्ण करणार आहेत. त्यानंतर पुन्हा हैद्राबाद येथे त्यांचे उर्वरीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे तीन ते चार वर्षासाठी सहा. जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून पदभार मिळणार आहे. आणि यानंतर तामिळनाडू राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून नेमणूक मिळणार आहे.
आचरा चिंदर गावचे सुपुत्र असलेल्या सुब्रमण्य केळकर यानी युपीएससी परीक्षेत देशस्तरावर ४९७ वा क्रमांक मिळवित उज्वल यश संपादन केले होते. दरम्यान सुब्रमण्य केळकर यांची भारतीय पोलीस सेवा साठी निवड झाली होती. आपल्या बुद्धीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या सुब्रमण्य केळकर यांच्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा आचरा व चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. डाक विभागाने नुकताच टपाल तिकिटावर त्यांचा फोटो प्रसिद्ध करून सन्मान केला होता. त्यांच्या सन्माना बद्दल सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.