वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या २ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक आज १५ जानेवारी रोजी होत असून आरवली ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी २७ उमेदवार तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीन मधून शिवसेनेच्या समृद्धी कुडव या बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ८ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत.आरवली ग्रामपंचायतीमध्ये पुरुष ८६५ व महिला ८४७ मिळून एकूण १७१२ मतदार आहेत, तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीमध्ये पुरुष ८२८ व महिला ८३७ मिळून एकूण १६६५ मतदार आहेत. आरवलीत ३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे व
सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या ३ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी ४ या प्रमाणे एकूण २४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर ८ राखीव कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. आरवली ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयेश राऊळ व सागरतीर्थ ग्रामपंचायतीसाठी व्हि. एस. चव्हाण हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.दरम्यान शिवसेना, राष्ट्रीय – राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपा या तिन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.आरवली ग्रा.प.साठी भाजपाने शिवसेनेला धक्का देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.तसेच सागरतीर्थ याठिकाणी काँगेस आघाडी व शिवसेना ,अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी याठिकाणी सुद्धा परिवर्तन घडविण्यासाठी भाजप पदाधिकारी यांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत.त्यामुळे आज १५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत कोण वर्चस्व राखते,हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page