सावंतवाडी /-
कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग ही संस्था जिल्हाभर संकटात असलेल्या विविध वन्यप्राण्यांना जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य करत आहे. सावंतवाडी येथील एका खड्ड्यात पडलेल्या भटक्या कुत्रीचे प्राण वाचवून असेच कार्य करत पुन्हा एकदा भूतदया दाखवली आहे.
सावंतवाडी खासकीलवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नं ४ या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. सदर इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या १० फूट खोल शौचालयाच्या टाकी मध्ये एक भटक्या जातीची कुत्री पडल्याचे प्राणीप्रेमी आणि भटक्या कुत्र्यांना अनेक वर्ष संभाळ करणाऱ्या श्रीमती अरुणा शिवेश्वरकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग या संस्थेशी संपर्क साधला.
सदर घटना समजताच संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे, खजिनदार महेश राऊळ, डॉ. प्रसाद धूमक, गौरव वराडकर यांनी घटनास्थळी जात अथक परिश्रम घेत कुत्रीस सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.या संस्थेने या आधीही असेच संकटात असलेले अनेक पशु-पक्षी यांना त्यांच्यावर उपचार करून जीवनदान देण्याचं काम केले आहे यात मगर, मोर, कोल्हा, खवले मांजर,माकड, समुद्री कासव,अनेक प्रकारचे साप,अशा संकटात असणाऱ्या आणि जखमी प्राण्यांना जीवनदान देण्याचं काम केले आहे.सद्या बर्ड फ्लू चे संकट येऊ घातले असल्याने कृपया थोडे दिवस कुठे मृत किंवा जमिनीवर पडलेले पक्षी आढळुन आले तर त्यांना हात लावू नका असे आवाहन कोंकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम ,सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आल आहे.