वेंगुर्ला /-
नेहरू युवा केंद्र आणि वेताळ प्रतिष्ठान तर्फे युवक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो,नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा सप्ताहाचे उदघाटन पं.स.सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी स्वामी विवेकानंद याच्या जीवनावर प्रकाश टाकत अनुश्री कांबळी यांनी युवक-युवती यांना मार्गदर्शन केलं, वर्तमान काळ ही आपणांस मिळलेली सुंदर देणगी असून युवकांनी या काळात कठोर परिश्रम घेऊन आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीले पाहिजे असे प्रतिपादन केले. स्वामीजी जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी स्वामींचे विविध पैलू उडघलून सांगितले, ‘धैर्याने, शौर्याने पुढे चला. एखादया दिवसात वा एखादया वर्षातच यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका, मतस्त्र आणि स्वार्थपरायणता या दोन्ही गोष्टी टाळा. कामाविषयी सर्वदा प्रामाणिक राहा. म्हणजे अवघे जग हलवून सोडाल. लक्षात ठेवा की, स्वतःचे व्यक्तिमत्त्व, स्वत:चे जीवन हेच शक्तीचे रहस्य आहे. अन्य काही नाही. या स्वामींच्या विचारांचा नियमित अवलंब करा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित युवकांना केले. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर,संजय पाटील, बाबली परुळकर, महेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.प्रतिष्ठानच्या वतीने युवा सप्ताह अंतर्गत युवा प्रबोधन व जनजागृतीपर सादरीकरण करण्यात येणाऱ्या पथनाट्याचे अनावरण सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सदाशिव सावंत यांनी मानले.