कुडाळ /-
मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागच्या पोलीसांनी एकूण १५ लाख ६८, हजार ३४० रुपयांचा गुटखा मुद्देमालासह पकडला असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार दयानंद चव्हाण यांनी दिली. सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस. देसाई यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर गस्त घालत असताना कुडाळ महामार्गावर क्रांती सिरमिक दुकानासमोर अशोक लेलैंड केए २२/सी/ ५२७३ या ट्रकमधून छोटा हत्ती एम.एच.०७/एजे१५५६ मध्ये उतरवताना गस्तीवरील पोलीसांच्या निदर्शनास आलं. पोलीसांनी याबाबत विचारणा केली असता ट्रकचालक संतोष मनोहर शिंदे, बेळगाव यांनी गुटख्याबाबतची माहिती दिली. या दोन्ही गाड्या पोलिस स्थानकात आणण्यात आल्या. यावेळी टकचालकासह क्लिनर रुपेश विष्णू माने, (३२) बेळगाव तसेच छोटा हत्ती चालक दत्ता (सुशिल) गुरुनाथ पडते (५०) कुडाळ बाजारपेठ यांच्यासह गुटखा विक्रेता रवींद्र गजानन ढवन (४२) पावशी ढवणवाडी यांना ताब्यात घेतलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात १ लाख ६८ हजार ३४० रुपयांचा गुटखा सापडल्याचं पोलीसांनी सांगितलं; तर १० लाखाचा ट्रक आणि ४ लाखाचा छोटा हत्ती टेम्पो यांच्यासह एकूण १५ लाख ६८ हजार ३४० रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला.
या घटनेमुळे सिंधुदुर्ग हे अंमली पदार्थाचे केंद्र होतय का, अशा प्रकारची चर्चा होत आहे. चार दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांनी कुडाळातील नामवंत व्यकतींशी चर्चा केली होती,आणि चारच दिवसात ही कारवाई झाली आहे.