मालवण /-
तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. सहा ग्रामपंचायतीच्या एकूण ५४ जागांसाठी ही निवडणूक होत असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३९ उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले आहेत. सहा ग्रामपंचायत कार्यालय क्षेत्रातील १० हजार १९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ५ हजार २७८ महिला तर ४ हजार ९१६ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
तालुक्यातील कुणकवळे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी लढत होत असून १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गावात ३०९ महिला व २७४ पुरुष मतदार आहेत. गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी निवडणूक होत असून २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गावात ९७१ महिला व ९२१ पुरुष मतदार मतदान हक्क बजावतील. खरारे-पेंडूर ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी मतदान होत असून ३१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गावात १४३६ महिला व १३८२ पुरुष मतदार आहेत. मसदे-चुनवरे ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी निवडणूक होत असून २० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गावात ५७३ महिला व ५५३ पुरुष मतदार मतदान करू शकणार आहेत. आडवली-मालडी ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी मतदान होत असून १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गावात ५१७ महिला व ५०४ पुरुष मतदार आहेत. चिंदर ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी मतदान होत असून ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गावात १४७२ महिला व १२८२ पुरुष मतदार आहेत.
सद्य:स्थितीत सहा ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा तर दोन ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत सत्ता होती. तालुक्यात शिवसेनेकडून नुकतीच शिवसेना सदस्य नोंदणी गावागावात झाल्याने शिवसेनेला पोषक वातावरण आहे. मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने मेहनत घेतली असल्याचे चित्र आहे. सहा ग्रामपंचायतींच्या ५४ इतक्या जागांसाठी इच्छुक उमेदवार आखाड्यात उतरणार आहेत. त्यामुळे १५ डिसेंबरपासून सुरू झालेला गावच्या सत्तेच्या सारीपटाची ४ जानेवारीला उमेदवार निश्चिती होऊन नेमकी लढत कोणाशी होणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.