केरळ: तिरुवनंतपुरम येथे पतीने आपल्या पत्नीची विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर पतीने पोलिसांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. घरात फॅन्सी लाइट्स लावल्या होत्या. त्यांचा शॉक लागून पत्नीचा मृत्यू झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी तपास केल्यानंतर संशयावरून पतीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.
तिरुवनंतपुरमच्या काराकोणम परिसरात शाखाकुमारी ही आपला पती अरुणसोबत राहत होती. मागील शनिवारी रात्री ती घरात मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी चौकशी केली असता, ख्रिसमस असल्याने संपर्ण घरात रोषणाई करण्यात आली होती. फॅन्सी लाइट्सचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची बतावणी अरुणने केली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अरूण शाखाकुमारीला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेला होता. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. सुरुवातीला घरात काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तपास केला असता, काही महिन्यांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते आणि घरात काही कारणांवरून वाद सुरू होते, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी अरुणकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीला विजेचा शॉक देऊन तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.