भागलपूर: बिहारच्या भागलपूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे. जुगारात हरल्यानंतर पतीने आपल्याच पत्नीला नराधमांच्या हवाली केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर पतीने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर अॅसिड फेकले.
लग्नाला दहा वर्षे झाली तरी ती आई होऊ शकली नाही. तिच्या पतीने तिच्यावर जुगाराचा डाव खेळला. हरल्यानंतर त्याने तिला नराधमांच्या हवाली केले. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर पतीने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर अॅसिड फेकले. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिने थेट माहेर गाठले आणि आपल्या कुटुंबीयांना आपबीती सांगितली. ही घटना नोव्हेंबरमध्ये घडली होती. कुटुंबीय आणि तिने नुकतेच पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम पतीला अटक केली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबरमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. येथील सरोजचे १० वर्षांपूर्वी लोदीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीशी लग्न झाले होते. १० वर्षे होऊनही मुलगा झाला नाही. सरोज हा यावरून तिला टोमणे मारत असे. तसेच नशेत तिला मारहाण करत असे. सरोजने नोव्हेंबरमध्ये आपल्या पत्नीवर जुगाराचा डाव खेळला. त्यात तो हरला. हरल्यानंतर त्याने तिला इतर जुगाऱ्यांच्या हवाली केले. सर्वांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबाबत कुणाकडे वाच्यता करू नये, यासाठी धमकावले आणि तिला मारहाण केली. पतीने तिच्यावर अॅसिड फेकले. यात ती गंभीररित्या होरपळली होती.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिला नजीकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेही सासरची मंडळी तिच्यावर लक्ष ठेवून होते. शनिवारी रात्री उशिरा ती कशीबशी खोलीतून बाहेर निघाली. सासरच्या मंडळींची नजर चुकवून तिने माहेर गाठले. कुटुंबीयांना तिने सर्व हकिकत सांगितली. अखेर त्यांनी रविवारी पोलीस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दाखल केली.