झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर मॉडेलचा बलात्कार केल्याचा आरोप, महिला आयोगाचं महाराष्ट्र पोलिसांना पत्र

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर मॉडेलचा बलात्कार केल्याचा आरोप, महिला आयोगाचं महाराष्ट्र पोलिसांना पत्र

 

नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर 2013 मध्ये मुंबईतील एका मॉडेलचा बलात्कार  केल्याचा आरोप झालाय. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितलंय. आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी या प्रकरणात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय. यात त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे.
माध्यमांमधील वृत्तानुसार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांच्यावर मॉडलवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 2013 मध्ये मुंबईतील एका मॉडेलवर बलात्कार झाल्याचं सांगितलं जातंय. इतकंच नाही तर बलात्कारानंतर पीडितेच्या कुटुंबाला याबाबत सार्वजनिकपणे न बोलण्यासाठी धमक्याही देण्यात आल्याचा आरोप आहे.

बलात्कार पीडित मॉडेलचं कथित पत्र व्हायरल

संबंधित बलात्कार पीडित मॉडेलचं एक पत्रही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यात मागील 7 वर्षांपासून झालेल्या घटनांची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मांनी या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणी सविस्तर अहवाल देण्यास सांगितलंय. 2013 मध्ये याबाबत अहवाल दाखल झालेला आहे.

अभिनेत्री बनवण्याचं आश्वासन देऊन बलात्कार

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या पत्रात पीडितेने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप केलेत. हे पत्र पीडितेने मुंबई पोलिसांना लिहिलं होतं, असाही दावा केला जात आहे.

पत्रात काय म्हटलंय?

या मॉडेलला अभिनेत्री बनायचं होतं. या काळात तिची ओळख सुरेश नागरे नावाच्या व्यक्तीशी झाली. नागरेने या मॉडेलला अभिनेत्री करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं. 2013 मध्ये सुरेश नागरेने मॉडेलला काही लोकांची भेट घेण्यासाठी एका हॉटलमध्ये बोलावलं. हेमंत सोरेन यांच्यासह तेथे 3 लोक उपस्थित होते. यानंतर याच हॉटेलमध्ये या मॉडेलचा बलात्कार करण्यात आला. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेले असता तेथेही तिचा छळ झाला, असा आरोप या कथित पत्रात करण्यात आलाय.

 

अभिप्राय द्या..