धुरीवाडा येथील नागरिकांनी मानले खोत कुटुंबियांचे आभार.
मालवण /-
मालवण शहरातील वीज समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व बांधकाम सभापती यतीन खोत यांचा वीज वितरणशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अनेक वीज समस्या मार्गी लावण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर धुरीवाडा येथील मसुरकर कुटुंबीय यांच्या घर परिसरातील पूर्णपणे गंजून गेलेला वीज खांबही अखेर वीज वितरणने बदलला आहे.
दिनेश मसुरकर कुटुंबीय यांच्या घर परिसरात पावसाळा कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी साचते. अश्या स्थितित जिंर्ण झालेला येथील वीज खांब खालून गंजून गेला. वीज वितरणकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर गंजून गेलेला भाग कापून पुन्हा तोच खांब उभारण्यात आला होता. मात्र खांब केव्हाही कोसळून अपघात होण्याची भीती कायम होती.
याबाबत बांधकाम सभापती यतीन खोत यांचे मसुरकर कुटुंबीय यांनी लक्ष वेधले. खोत यांनी वीज वितरणकडे पाठपुरावा करून जीर्ण वीज खांब काढून नव्याने वीज खांब उभारला आहे. याबाबत मसुरकर कुटुंबीय यांनी यतीन खोत यांचे आभार मानले आहेत.