महाराष्ट्रातुन एकमेव तलाव ठरल्याने रोवला मानाच तुरा..
मालवण /-
मालवण तालुक्यातील सुप्रसिद्ध धामापूर तलावाची जागतिक हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अवॉर्ड २०२० साठी निवड जाहीर झाली आहे.
जगभरातील १४ तलावांची तर भारतातील एकूण ४ तलावांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून महाराष्ट्रातून एकमेव अशा धामापूर तलावाची निवड झाल्याने या पुरस्काराला विशेष महत्व प्राप्त होत आहे. धामापूर तलावा सोबत कुम्बम तलाव, कुरनोल- कुडपाह कालवा, पुरुमामीला या इतर तीन तलावांची संपूर्ण भारतातून निवड झाली आहे.तर फार्मर अवॉर्ड साठी मायक्रो इरिगेशन व फर्टिगेशन याविभागातून मेकला शिवा शंकर रेड्डी या शेतकऱ्याची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे.
इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज (आयसीआयडी) या जागतिक संस्थेकडून सदर निवड जाहीर करण्यात आली आहे. जगभरातील हेरिटेज तलावांसाठी एकूण चौदा पुरस्कार जाहीर झाले असून भारत ४, चायना ४, इराण २, जपान ३, तर कोरियाच्या एक तलावाची निवड झाली आहे.
◆ *सेंट्रल वॉटर कमिशनकडून सर्व्हेक्षण*
इंडियन नॅशनल कमिटीच्या वतीने आयसीआयडी कडे संपूर्ण भारतातून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. जुलै – ऑगस्ट महिन्यात सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन ( सिडब्लूपीआरएस) या भारत सरकारच्या नियंत्रणाखालील पुणे येथील आस्थापनाकडून व सेंट्रल वॉटर कमिशनकडून धामापूर तलावाचे सर्व्हेक्षण झाले होते. मुख्य अभियंता केशव मूर्ती, यांच्यासह स्यमंतक या संस्थेचे एनजीओ सचिन देसाई, पाटबंधारे उपविभाग सावंतवाडीचे उप विभागीय अभियंता संतोष कविटकर यांनी त्यावेळी योग्य प्रकारे सर्व माहितीचा अहवाल नवि दिल्ली येथील सेंट्रल वॉटर कमिशनला दिला होता.
मालवण तालूक्यातील धामापूर तलाव हे एक रमणीय ठिकाण आहे . सदैव. हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड पोफळीच्या बागा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुतर्फा डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव यामुळे धामापूर हे उत्कृष्ठ पर्यटन केंद्र बनले आहे . या ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठावर श्री भगवतीचे प्राचीन देवालय आहे. सुमारे ५ एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सदर पुरस्कारासाठी केवळ धामापूर तलावाची निवड झाल्याने मालवण तालुक्याच्या पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शीरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. धामापूर तलावाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या सर्वांचे या निमित्ताने अभिनंदन होत आहे.