सावंतवाडी /-
सावंतवाडी शहरातून गेलेल्या जुन्या झाराप ते इन्सुली या राष्ट्रीय महामार्गावरील सावंतवाडी पोलीस ठाण्या समोरील रस्त्यावरील खड्डे तात्काळ न बुजविल्यास ग्रामस्थांना घेऊन खड्ड्यातच उपोषणाला बसू, असा इशारा पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला. यावेळी डांबर प्लांट सुरू होतात सदरचे रस्त्याचे काम हाती घेऊ, असे उत्तर बांधकाम उपअभियंता आवटी यांनी दिले. मात्र तोपर्यंत वाहनधारकांनी खड्ड्यात पडून मारायचे का असा सवाल करत श्री सावंत यांनी येत्या आठ दिवसात खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा माझ्याशी गाठ असेल,असे खडेबोल सुनावल्यावर खड्डे बुजविण्याचे आश्वासन आवटी यांनी यावेळी दिले.
सावंतवाडी पंचायत समिती सभापती मानशी धुंदी यांच्या केबिनमध्ये मासिक बैठकीत गैरहजर राहिलेल्या महत्त्वाच्या खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उपसभापती शीतल राऊळ,.पंचायत समिती सदस्य रवींद्र वडगावकर, श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये वीज वितरण कंपनीचे उपअभियंता भुरे यांना तालुक्यातील वीज पंपासंदर्भात.२०१४ पासून आत्तापर्यंत प्रस्ताव करूनही रखडलेल्या वीजजोडणी संदर्भात विचारणा करण्यात आली. यावेळी भुरे यांनी ६०० मीटरपर्यंत १० पोलच्या विद्युत जोडणी देण्यात येते, मात्र त्यापुढे सौर ऊर्जेवरील योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो, असे स्पष्ट केले. मात्र २०१४ पासून आत्तापर्यंत ३७ शेतकऱ्यांनी केलेल्या प्रस्तावाचे काय, असा सवाल त्यांना केला असता यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे एक प्रकारे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर नवीन वीज पंप जोडणी हवी असल्यास प्रस्ताव करण्याचे आवाहन त्यांनी केले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जुन्या झाराप ते इन्सुली राष्ट्रीय महामार्गावर सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.