सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यामध्ये कोरोनाची साथ सुरु असून ती आटोक्यात असली तरीही आता माकडतापाची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून माकड तापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या केएफडी (माकडताप)समन्वय समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.जे. नलावडे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या जिल्हा रुग्णालयामध्ये मॉलिक्युलर लॅब तयार झाली आहे. सध्याचा काळ हा माकडतापाची साथ सुरु होण्याचा काळ आहे. त्यामुळे माकडतापाच्या (KDF) अनुषंगाने टेस्टींगचे काम सुरु करण्यात यावे. त्यासाठी लागणारी अनुषंगीन उपकरणे व यंत्रणा सज्ज ठेवावी. साधन सामुग्रीमध्ये काही उपकरणे कमी पडत असतील तर त्याचा प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे तातडीने पाठविण्यात यावा. या साधनसामुग्रीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल. असे सांगून, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या, माकडताप रुग्णांना लागणारी औषधे तातडीने उपलब्ध व्हावी,यासाठीची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. औषधांचा साठा आरोग्य यंत्रणेकडे तयार असावा. औषधे खरेदी करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी माकड मृत अवस्थेमध्ये आढळल्यास व ते कोणाच्याही निदर्शनास आल्यास संबंधितांनी 1077 या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केएफडी सद्यस्थिती, लसीकरण नियोजन, मृत माकड विल्हेवाट, रुग्ण व्यवस्थापन या बाबींचा विभागवार आढावा घेतला.

दिवाळीकालावधीत जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

जिल्ह्यात कोरोना सध्या अटोक्यात आहे. तथापी दिवाळीचा सण दोन दिवसावर आलेला आहे. यामुळे जिल्ह्यात मुंबई तसेच इतर भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांची कोरोना टेस्ट करा असे, आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी देवून जिल्ह्यामध्ये आर.टी.पी.सी.आर व रॅपिड ॲन्टीजन टेस्ट वाढविण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य यंत्रणेने जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांना कोरोना टेस्ट करण्याबाबत प्रबोधन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी कोरोना टेस्ट करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात यावी. त्यासाठी प्रशिक्षित वर्ग उपलब्ध करण्यात यावा.कोरोना टेस्ट बरोबर बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीची ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान यांची टेस्ट करण्यात यावी. हे सर्व काम करताना डॉक्टर्स,नर्स व इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वत:ची काळजी घेवून हे काम करावे. असे आवाहनही शेवटी त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page