करोना आढावा बैठकीत विविध मुद्दय़ांवर चर्चा

नाशिक : करोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईवर न थांबता संबंधितांना पोलीस ठाण्यात आणून बसवावे. सणासुदीच्या काळात बेफिकीरपणे वागणाऱ्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवावे. जेणेकरून नियमांचे पालन करण्याची सर्वाना जाणीव होईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सूचित केले. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक देशांची बिकट स्थिती झाली आहे. करोना संसर्गाचा नवीन फेरा ही लाट नाही तर त्सुनामी असू शकते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने सज्जता राखावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

सोमवारी पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत करोनाची आढावा बैठक पार पडली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आहे. प्रदीर्घ काळ दुकानांत खरेदीसाठी गर्दी होणे साहजिक आहे. हळूहळू ही गर्दी कमी होईल. तथापि, व्यावसायिक, दुकानदारांनी मुखपट्टी नसलेल्यांना दुकानात प्रवेश देऊ नये, त्यांना कोणत्याही वस्तूची विक्री करू नये, असे भुजबळ यांनी सूचित केले. करोनासंबंधीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन शासनासह स्थानिक यंत्रणेकडून वारंवार केले जात आहे. काही बेफिकिरांचा नागरिकांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोलीस यंत्रणेला अधिक प्रभावीपणे काम करण्यास सांगण्यात आले आहे. सद्य:स्थितीत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण, पोलिसांनी एवढय़ावरच थांबू नये. नियमभंग करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवावे. जेणेकरून इतरांना नियम न पाळल्यास सणासुदीच्या काळात पोलीस ठाण्यात बसावे लागते हे लक्षात येईल, असे भुजबळ यांनी नमूद केले.

यंदाची दिवाळी करोनामुक्त राहण्यासाठी ती फटाकेमुक्त राहून साजरी करणे आवश्यक आहे. ११ हजारच्या आसपास असलेली रुग्णसंख्या तीन हजारावर आली आहे. सध्या ऑक्सिजनवर केवळ ४५० रुग्ण आहेत. मध्यंतरी प्राणवायूची कमतरता असली तरी आज आपल्याला दिवसाला १० मेट्रीक टन इतक्या प्राणवायूची गरज आहे. व्हेंटिलेटर्सवर केवळ ५० रुग्ण उपचार घेत असून आज आपण २५० व्हेंटिलेटर्सची क्षमता राखून आहोत. जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव ओसरतो आहे. राज्याचा करोना मृत्युदर हा २.६३ टक्के इतका आहे. त्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्युदर कमी म्हणजे १.६५ टक्के इतका आहे. राज्यात मृत्यू होणाऱ्या जिल्ह्यांच्या क्रमवारीत नाशिक ३० व्या क्रमांकावर आहे. रुग्ण बरे  होण्याची टक्केवारी ९२ टक्क्यांपेक्षा अधिक असून जिल्ह्यात करोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४६ दिवसांचा आहे. सर्व यंत्रणा सतर्कपणे काम करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page