बांदा /-
उन्हाचे चटके सहन करत सकाळपासून संध्याकाळपर्यंत भातकापणीत मेहनत घेत असलेल्या शेतकऱ्याच्या भातपिकाची गव्यांनी सोमवारी रात्री नासधुस केल्याची घटना पाडलोस-केणीवाडा येथील घडली. अतिवृष्टीपाठोपाण अशा अस्मानी संकटांनी बळीराजा पुरता हैराण झाला असून प्रशासनास कधी जाग येणार आणि उपद्रवी गव्यांचा बंदोबस्त करणार असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे.
भातकापणी अंतिम टप्प्यात असताना हातातोंडाशी आलेला घास गव्यांच्या उपद्रवामुळे नासधुस होत आहे. काही शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या भात व नाचणी पिकातही गव्यांनी आपला मोर्चा वळविल्याने शेतकरी हतबल झाला आहे. झोपी गेलेल्या वनविभागाला भातपिकाचे पुरते नुकसान झाल्यानंतर जाग येणार काय असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे.
आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाने भातकापणीस जोरदार सुरूवात केली आहे. शेतात पिकून उभे असलेले भात ताब्यात घेण्यासाठी उन्हाचे चटके सोसत सकाळ ते संध्याकाळपर्यंत मेहनत घेत आहे. सोमवारी रात्रो केणीवाडा येथील संजय दत्ताराम नाईक यांच्या भातपिकात फिरून संपूर्ण पिकाची नासाडी केली. तर विश्वनाथ नाईक यांच्या नाचणीचेही नुकसान केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी तर गोविंद पराडकर व वामन केणी यांनी कापून ठेवलेल्या भाताचे अतोनात नुकसान केले. अतिवृष्टीमुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा आता गव्यांच्या उपद्रवामुळे पुरता हैराण झाला आहे.
तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अशा उपद्रवी गव्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश वनविभागाला दिले होते. परंतु झोपी गेलेल्या वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना अशा नैसर्गिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.