पालकमंत्री सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहीती
कोल्हापूर /-
केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे येत्या ५ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या रॅलीची सुरुवात निर्माण चौक, कोल्हापूर येथून होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज पत्रकार बैठकित दिली आहे.
याविषयी सांगताना ना. पाटील पुढे म्हणाले की, कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयकं मंजूर करुन घेतली. लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.
महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून नुकत्याच १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले होते. त्या व्हर्चुअल रॅलीच्या माध्य्मातून राज्यातील १० हजार गावातील सुमारे ५० लाख शेतक-यांशी काँग्रेस नेत्यांनी संवाद साधला होता. केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी कायदा आणून मोदी सरकार आपल्या अन्नदात्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या विरोधात काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे.
भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी या काळ्या कायद्यांविरोधात येत्या गुरुवार दि. ०५ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता निर्माण चौक, संभाजी नगर, कोल्हापूर येथून ही रॅली सुरु होणार असून याची सांगता दसरा चौक येथे होणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, तालुकाध्यक्ष व विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी या रॅलीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ना. पाटील यांनी केले आहे.
या पत्रकार बैठकीला महापौर निलोफर आजरेकर जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील (तात्या ) गुलाबराव घोरपडे उपमहापौर संजय मोहिते, सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, चंदा बेलेकर, संपत चव्हाण पाटील, विक्रम जरग आदी उपस्थित होते.