ते अनुचित विधान तत्काळ मागे घेऊन राज्यभरातील किराणा व्यापाऱ्यांची जाहिर माफी मागा.

मालवण /-

गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या महाराष्ट्राच्या महसुल राज्यमंत्र्यानी विनाकारण किराणा व्यापाऱ्यांबाबत कुत्सित आणि हिणकस उद्गार काढल्याचे निदर्शनास येत आहे. कदाचित आपल्या आगत स्वागतात त्यांच्याच अखत्यारीतील खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कुचराईने अंगाचा तिळपापड झालेल्या महसुल राज्यमंत्र्यांनी किराणा व्यापाऱ्यांच्या संदर्भात केलेली हे अनुचित विधान तत्काळ मागे घेऊन राज्यभरातील किराणा व्यापाऱ्यांची जाहिर माफी मागावी, अन्यथा संबंधित मंत्र्यांच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन उभे करण्याची ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापारी बांधवांचे एकमुखी प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा व्यापारी महासंघात आहे. व्यापारी महासंघ वसूल मंत्र्यांच्या या बेजबाबदार विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. असे महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

लाॅकडाऊनच्या काळातील मागील सहा सात महिन्यात राज्यभरातील किराणा व्यापाऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या हाकेला प्रतिसाद देत जिवाची जोखिम पत्करून गावागावातील तुटपुंज्या आणि विस्कळीत प्रशासन यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून सर्वसामान्य जनतेला जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम अविश्रांत पणे केले आहे. या काळात दुकान उघडायला जाताना त्याच्या कुटुंबीयांच्या मनात काय कल्लोळ उठत असेल हे समजण्याची क्षमता ‘कोविड काळात हस्तिदंती मनोऱ्यात दडी मारून बसलेल्या’ राज्यमंत्र्या मधे नसावी, अन्यथा व्यापाऱ्यांबद्दल असे उदगार काढण्यापुर्वी त्यांनी शंभरदा नक्कीच विचार केला असता. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी या काळात कसे काम केले याची माहिती नसल्यास त्यांनी ती आपल्या नेत्या कार्यकर्त्यांकडून करून घ्यावी.

त्यांच्याच खात्याचे कित्येक अधिकारी कर्मचारी या काळात घरात बसले असताना किंवा पुर्ण सुरक्षित कोषात राहुन काम करत असताना शासकीय सक्तीमुळेच गावागावातील किराणा व्यापारी कोणत्याही शासकीय सुरक्षा कवचा शिवाय आणि अनेकदा विनाकारण होणाऱ्या जाचक कारवाईला तोंड देत आपली कामगिरी बजावत होता. यात कित्येक जण कोरोना बाधीत झाले, काही जणांना तर आपला जिव गमवावा लागला. या बद्दल सहानुभुती तर सोडाच पण साधे ऋण ही व्यक्त करण्याचे सौजन्य आजवर कोणीच दाखविलेले नाही. एवढेच नव्हे तर महामारीच्या काळात सर्व व्यापार उदिम सक्तीने बंद ठेवावे लागल्या मुळे विजेची भरमसाठ बिले आणि बँकांचे व्याज, कामगारांचे पगार, जागांचे भाडे, मालाच्या कालबाह्यतेमुळे झालेले नुकसान याच्या भरपाई बद्दल कोणीही मंत्री चकार शब्द काढत नाही याची खंत तमाम व्यापाऱ्यांच्या मनात खदखदत असतानाच वसूल मंत्र्याचे हे वक्तव्य व्यापाऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळणारेच आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापारी महासंघाने कोरोना काळात शासन प्रसासनास कसे सहकार्य केले आहे, त्यासाठी प्रसंगी आपल्याच व्यापारी सभासदांचा रोष पत्करून जिल्ह्यातील महामारी आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रित ठेवण्यात सर्वतोपरी मदत कशी केली आहे याची माहिती आणि जाणिव खासदार, पालकमंत्री,
आमदार आणि जिल्हाधिकारी यांना निश्चितच आहे. मात्र असे असताना कोकणातील सामाजिक राजकीय वातावरणाची अजिबात जाण नसलेल्या वसूल मंत्र्यांनी ‘किराणा व्यापारी म्हणजे त्यांच्या समोर गोंडा घोळणारे त्यांचे हुजरे नव्हेत’ हे लक्षात घेऊनच टाळ्याला जिभ लावावी, असा सणसणीत इशाराही महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page