काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. यावरुन काँग्रेस पक्षातील दोन गटांमध्येच मतभेद पहायला मिळाले. या सर्व घडामोडींवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक सल्ला दिला आहे.शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन त्यांनाच काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद स्विकारण्यास राहुल आणि सोनिया गांधी दोघेही तयार नसल्यामुळे ही सूचना करत असल्याचं आठवलेंनी म्हटलंय.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे.याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.काही दिवसांपूर्वी गांधी घराण्यातील व्यक्तीऐवजी इतर नेत्यांकडे काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवण्यात यावं हा विचारही पुढे आला होता. खुद्द सोनिया गांधी यांनीही या विचाराला आपलं समर्थन देत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र अद्याप यावर कोणातही अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनाच अध्यक्षपद द्यावं अशी मागणी केली होती, परंतू त्यावरही अंतिम निर्णय झालेला नाही. काही दिवसांपूर्वी गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या, ज्यावरुन मोठं वादळ निर्माण झालं होतं. सध्याच्या घडीला पुढील सहा महिने सोनिया गांधीच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहणार असून यानंतर निवडणुका घेतल्या जाणार असल्याचा निर्णय कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.