मालवण /-

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करुन उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची बऱ्याच वर्षाची मागणी सत्यात उतरणार आहे. याबद्दल युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी श्री. देशमुख यांचे आभार मानले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत होती. ही मागणी आता सत्यात उतरण्याचे संकेत मिळाले आहेत. जिल्हावासियांसाठी आनंदाची बाब आहे. महाविकासआघाडी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जागा निश्चित करण्यात येणार आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. यावेळी अमित देशमुख यांनी हे निर्देश दिले. दरम्यान या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग २० एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करावी. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करण्यात यावा असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाने किमान २० एकर जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागास लवकरात लवकर कळवावे असे निर्देश श्री. देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page