मेघनाद धुरी यांचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना निवेदन…
मालवण / –
छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या वेळी दांडी येथील किनाऱ्यावर जेथे किल्ल्याचे भूमिपूजन केले त्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाचे ऊन, वारा, पाऊस व समुद्री लाटांपासून संरक्षण होण्यासाठी या धोंड्याभोवती काळे दगड टाकून तो संरक्षित करावा तसेच त्याठिकाणी शिवलिंग स्वरूपात मंदिर बांधण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साडे तीनशे वर्षांपूर्वी मालवणच्या समुद्रात किल्ले सिंधुदुर्गची उभारणी झाली. या किल्ल्याच्या बांधकामावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना आमंत्रित करून दांडी किनाऱ्यावरील खडकावर गणपती, शिवलिंग, सूर्य, चंद्र, पादुका, नंदी अशी चित्रे कोरून घेऊन त्याठिकाणी गणेश पूजन व भूमिपूजन करण्यात आले. तेव्हापासून या खडकाला मोरयाचा धोंडा असे संबोधले जाते. या धोंड्याच्या जागेची शासन दरबारी देखील नोंद करण्यात आली आहे. हा धोंडा समुद्र किनाऱ्यावर असल्याने त्याचे ऊन, वारा, पाऊस आणि समुद्राच्या लाटांपासून संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी धोंड्याभोवती सात फूट खोल अंतरापर्यंत काळे दगड टाकून तो संरक्षित करावा. या दगडांच्या पायावर शिवलिंग स्वरूपात मंदिर बांधण्यात यावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्व्हे करून आरखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी श्री. धुरी यांनी निवेदनात केली आहे.