जळगाव /-

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी अजूनही कायम दिसत आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये आलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट खडसेंनी टाळली. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा पक्षांतराचा निर्णय निश्चित झाल्याच्या शक्यतेला बळकटी मिळत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून ताणली गेलेली फडणवीस- खडसेंच्या संभाव्य भेटीची उत्सुकता अखेर संपली. एकनाथ खडसे यांनी गेल्या काही महिन्यात देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत थेट निशाणा साधला होता.

मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारिणी प्रत्यक्ष बैठकीला दांडी मारत खडसे ऑनलाईन सहभागी झाले होते. फडणवीस उपस्थित असल्यामुळेच खडसेंनी हजेरी टाळल्याची चर्चा होती. यावरुनच देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसेंचा रोष कायम असल्याचे दिसून येते.
वैयक्तिक कारणास्तव एकनाथ खडसे अनुपस्थित
देवेंद्र फडणवीस जामनेरमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले होते. नाराज असलेले खडसे आणि फडणवीस यावेळी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहतील का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र खडसेंनी वैयक्तिक कारण देत उपस्थिती टाळली. फडणवीस हाकेच्या अंतरावर आले असतानाही खडसेंनी न जाणं हे नाराजीचं स्पष्ट लक्षण मानलं जातं. मुक्ताईनगरमधील भाजपच्या घंटानाद कार्यक्रमालाही खडसे अनुपस्थित राहिले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी खडसे यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र खडसेंनी अनुपस्थित राहणार असल्याचे कळवल्यानंतर उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावर एकनाथ खडसे यांच्या नावाचे स्टिकर काढण्यात आले.
दरम्यान, गिरीशभाऊ म्हणजेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपल्याला काल निमंत्रण दिलं होतं. आजही त्यांचा फोन आला, भोजनाचंही निमंत्रण होतं. उत्तर महाराष्ट्रात अशी सुविधा असलेले हॉस्पिटल नाही, जामनेरसारख्या छोट्याशा तालुक्यात एवढे मोठे हॉस्पिटल उभारले जात आहे, यासाठी मी त्यांचे कौतुक केले, अभिनंदन केले, मात्र व्यक्तिगत कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचं कळवलं, अशी माहिती खडसेंनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.
गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजपच्या गुप्त बैठकीलाही एकनाथ खडसे गैरहजर होते. मात्र खडसेंच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे या बैठकीला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page