कणकवली /-

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्ह्यात दलित मुलीवर झालेला बलात्काराचा व तिच्या निधनानंतर राज्य सरकारने केलेल्या अमानवी व्यवहाराचा तीव्र निषेध करत आज सत्यशोधक जन आंदोलन सिंधुदुर्गच्या वतीने कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पिढीतेला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्स पाळत लोकशाही पद्धतीने हा मोर्चा निघाला होता.

केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर उत्तम प्रदेश पोलीस यंत्रणेचा निषेध करण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे कि, १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील भूलगडी या गावात घडलेली दलित मुलीवरील अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी असून निषेधार्ह आहे.ही घटना एकूणच भारतातील जातीव्यवस्था -पितृसत्ता आणि भांडवलशाही यांचे द्योतक आहे. हाथरस घटनेचा घटनाक्रम लक्षात घेता हे सिद्ध होते की, उत्तर प्रदेशातील सरकार व तिचे प्रशासन आणि वरचढ शेतकरी जातीतील उच्चभ्रू यांची अभद्र यूती ही अमानवीय घटना दाबून टाकण्यासाठी आणि आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल न करता पिडीत मुलीकडे दुर्लक्ष करणे,वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला न मानता पिडीत मुलीला वेगळ्याच दवाखान्यात दाखल करणे,पिडीत मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे,तिच्या कुटुंबाला डांबून ठेवणे व इतरांशी संपर्क न करू देणे हा गुन्हा दाबून टाकण्याचा संतापजनक प्रयत्न असून लोकशाही मूल्यावरच अत्याचार करण्यासारखे आहे.

शासनकर्ता वर्ग हा स्वत:च्या आर्थिक व राजकीय हितसंबंधाच्या रक्षणासाठी जात व पुरुषसत्ताक मूल्यांना खतपाणी देतात.धनदांडगे आणि जातदांडगे हे अशा प्रकारची गुन्हेगारी व्यवस्था प्रस्थापित करतात.पोलिस यंत्रणेतील एक मोठा विभाग त्यांच्या देवाण-घेवाणच्या साखळीत असतो.राज्यकर्ता वर्ग या साखळीचे बळकटीकरण करण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर करीत आहे.यातून स्त्रियावरील अत्याचारांच्या घटनेत प्रचंड वाढ झालेली दिसते.अशा शासनकर्त्या वर्गावर हल्लाबोल करणे आज आवश्यक बनले आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्काराची घटना ज्यात बलात्कार करणारा भाजपाचा आमदार होता.गुन्हा दडपण्यासाठी पिडीतेवर हल्ला करण्यात आला.भाजप नेता स्वामी चिन्मयानंद उच्चशिक्षित मुलींकडून क्रूरकर्म करून घ्यायचा.

कठुआ (जम्मू)बलात्कार प्रकरणात आठ वर्षीय मुलीवर मंदीरात बलात्कार केला गेला.काही दिवसांनी तिचा गळा दाबून खून करण्यात आला.मध्य प्रदेशातील प्रदीप जोशी,भाजप नेता भोजपाल सिंग याने एका दलित महिलेला रेशन कार्डचे आमिष दाखवून बलात्कार केला. उपरोक्त सर्व घटनांमध्ये आरोपी हे सत्ताधारी राजकीय पक्षाचे असून उच्च जातीय आहे.या घटनांमुळे सत्ताधारी उच्च जाती ,सरकार आणि प्रशासन यांची यूती स्त्रियांच्या लैगिक शोषणासाठी कार्यरत असल्याचे दिसते,हाथरस घटनेत देखिल या वरचढ शेतकरी जातीतील उच्चभ्रू असलेल्या ठाकूरांना वाचविण्याची धडपड सत्ताधारी भाजपचे सरकार करीत आहे. हाथरस मधील दलित मूलीवर झालेला अत्याचाराचा व तिच्या निधनांनंतर सरकार व प्रशासनाने केलेल्या अमानवी व्यवहाराचा सत्यशोधक जनआंदोलन सिंधुदुर्ग, सत्यशोधक विद्यार्थी संघटना व सत्यशोधक महिला सभा सिंधुदुर्गच्या वतीने जाहिर निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.

यावेळी पिडीत मुलीला व तिच्या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या. हाथरस बलात्कार प्रकरणाची न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी. हाथरस बलात्कार घटनेची F.I.R. घेण्यास हलगर्जी करणा-या पोलिस अधिका-यांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. हाथरस बलात्कार पिडीत मुलीच्या शवाची कुटुंबाला अंधारात ठेवून विल्हेवाट लावण्याचा अमानवी व्यवहार करणा-या अधिका-यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. वाढत्या स्त्री हिंसाचाराच्या विरोधात सरकारने कठोर धोरण राबवावे. कोरोनाने मृत्यू झाला असता तर पैसेदेखिल मिळाले नसते असे बेजबाबदार वक्तव्य करणा-या व पिडीतेच्या कुटुंबियांना धमकावणा-या जिल्हाधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
योगी आदीत्यनाथ यांच्या राजवटीत उत्तर प्रदेशात स्त्रीयांवरील अत्याचार व जातीय अत्याचार बेसुमार वाढले असून स्त्रिया व दलित आदीवासींची सुरक्षा करण्यात उत्तर प्रदेशचे योगी सरकार सपशेल अपयशी ठरले असून केंद्र सरकारने योगी सरकार बरखास्त करावे. अशा मागण्या करण्यात आल्या.

या मोर्चात अंकुश कदम, स्वाती तेली, दिपक दाजी कदम, दिपक जाधव, विवेक ताम्हणकर, विकास कदम, अनघा कदम, सुमित पेडणेकर, महेश पेडणेकर, उषाकिरण सम्राट, निलिमा जाधव, राजेंद्र कांबळे, हनुमान दया आजवेलकर, रोशन कदम,साक्षी जाधव,मोहिनी तांबे, निवृत्ती तांबे, क्रांतीराज सम्राट, कृष्णा जाधव, निलेश जाधव, सुनील कदम, राहुल कदम, रितेश तांबे आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page