सीईटीची परीक्षा देवून चुलत भावाबरोबर दुचाकीवरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मुळ गावी परतत असलेल्या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण झाले असल्याची घटना शनिवारी सकाळी ७ ३० वाजण्याच्या सुमारांस दिवे घाटात घडली आहे. हे अपहरण एक दुचाकी व एक चारचाकी मधून आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून केले असून यांतील एकजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.याप्रकरणी तरूणीच्या २० वर्षीय भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अनिस पठाण व त्याचे दोन मित्र ( पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणीचे गाव पुरंदर तालुक्यात असून तिचे वडील पुणे येथील एका शासकीय कंपनीत कामाला असल्याने ते पत्नी मुलगा व अपह्रत मुलगी यांच्यासमवेत फुरसुंगी ( ता. हवेली ) परिसरातील एका गावात वास्तव्यास आहेत. सुमारे १ वर्षापूर्वी अनिस पठाण याने ह्या तरुणीवर बळजबरीने बलात्कार केला होता. याबाबत त्याच्याविरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही पठाण हा तिचा वारंवार पाठलाग करून त्रास देत असल्याने सुमारे ४ महिन्यांपूर्वी चुलत भावाने तिला आपल्यासमवेत मुळ गावी नेले होते. तेथेही १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ – ३० वाजण्याच्या सुमारास सर्वजण घरी असताना पठाण व त्याच्या मित्रांनी तरुणीच्या कुटुंबातील सगळ्यांना मारहाण केली होती. त्याबाबतही जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपह्रत तरूणीची पुणे येथे सीईटीची परीक्षा असल्याने चुलत भावाने तिला ३० सप्टेंबर रोजी वडिलांकडेे आणूूून सोडले होते. २ ऑक्टोबर रोजी तिने पेपर दिला व त्यानंतर शनिवारी ( ३ ऑक्टोबर ) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बहीण – भाऊ दुचाकीवरून हडपसर – सासवड रोडने चालले होते. त्याचवेळी लाल रंगाची स्विफ्ट कार (एमएच.१२ सीवाय. ७०५६) दुचाकीला आडवी लावली. तसेच दुचाकी(एमएच १२ क्युएस ८१०८) वरून दोन जण आले. त्यामध्ये एक अनिस पठाण हा होता. त्याच्यासोबत आलेल्याने कोयता काढुन उलट्या बाजुने तरुणीच्या भावाला मारला व बहिणीला बळजबरीने ओढु लागला. त्यावेळी प्रतिकार करणाऱ्या भावाला पुन्हा मारहाण केली. अनिस पठाण म्हणाला, तु मध्ये पडु नको मला या तुझ्या बहिणीसोबतच लग्न करायचे आहे . त्यानंतर बळजबरीने त्याने तरूणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले व हडपसर बाजूला निघुन गेला. घडलेला हा प्रकार फिर्यादीने त्याच्या चुलत्यांना सांगितला. तसेच ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात जावून तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे – पाटील व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page