▪️अतिक्रमण न हटल्यास उपोषण करण्याचा रहिवाश्यांनी दिलाईशारा..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,अमिता मठकर.
कुडाळ शहरातील सिद्धिविनायक गृहसंकुल फेज १ व फेज २ आणि शिवाजी पार्क तसेच सत्कार पाणंद वापर करणारे सर्व रहिवासी यांनी आज कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांना प्रत्यक्ष भेटून रहिवाश्यांनी निवेदन दिले.आणि अतिक्रमण हटवण्या संदर्भात चर्चा केली.या निवेदनाद्वारे असे निदर्शनास आणून देतो की, रविवार दि. १३/०८/२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता सिद्धिविनायक गृहसंकुल फेज २ मधील बी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेमध्ये गॅस सिलिंडरची गळती होऊन त्या सदनिकेमध्ये आगीचा भडका उडाला. सदर अपघाताच्यावेळी त्या इमारतीमधील रहिवासी व आजुबाजूच्या ग्रामस्थांनी प्रसंगाचे गांभिर्य ओळखून आग विझवण्याचे अतोनात प्रयत्न केले.या अपघाताच्यावेळी अग्नीशामक वाहन आग विझवण्यासाठी बोलावण्यात आला. सदर वाहन येतेवेळी बस स्टॅण्ड समोरील असलेल्या सत्कार खानावळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी बस स्टॅण्ड समोर असलेल्या अतिक्रमणामुळे अपघातस्थळी पोहोचण्यास विलंब झाला. अग्नीशामक वाहनाला वेगळ्या मार्गानि अपघातस्थळी पोहचावे लागले, त्यामुळे त्यास उशीर झाला.
आम्ही कुडाळ शहरवासीय मोठ्या प्रमाणात राहात आहोत. गेली ५ ते ६ वर्षे आम्ही नगरपंचायतीचे सर्व प्रकारचे कर न चुकता वेळेत भरणा करित आहोत, परंतु आजपर्यंत नगरपंचायत कुडाळ कडून आम्हांला कोणत्याही प्रकारच्या सोई-सुविधा किंवा रस्त्याची दुरूस्ती वारंवार निवेदन देऊन व आपल्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा करण्यात आलेल्या नाहीत.आजच्या अपघाताचे गांभिर्य पाहता पुन्हा अशी घटना घडू नये.सदरचा अपघात घडला त्यावेळी सदर इमारतीमधील व आसपासच्या रहिवाश्यांनी प्रसंगावधान राखून ही आग अथक प्रयत्नाने आटोक्यात आणली.आपले अग्नीशामक वाहन उशीरा पोहोचल्याने मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी होण्याचा तसेच जीवीतहानी होण्याचा धोका होता. भविष्यात इथल्या रहिवाश्यांची वाढती लोकवस्ती पाहता असा कोणताही अपघात झाल्यास अग्नीशामक वाहन अपघातस्थळी तात्काळ पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी अतिक्रमण हटवून सदरचा रस्ता मोकळा होणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला आम्ही या अगोदर मोर्चा काढून निवेदने दिलेली होती.
या घटनेचे गांभिर्य पाहता आपण यावर त्वरित योग्य ती कारवाई करून रस्ता मोकळा करणे आवश्यक आहे. अन्यथा होणाऱ्या घटनेमुळे होणारे मालमत्तेचे नुकसान, होणान्यास जिवितहानीस व वित्तहानीस नगरपंचायतीचा हलगर्जीपणा पूर्णतः जबाबदार राहील, याची आपण नोंद घ्यावी.या निवेदनाची त्वरित दखल घेऊन अतिक्रमण हटवून सदरचा रस्ता मोकळा करावा, अन्यथा आम्ही सर्व रहिवासी आपले कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत.असे सांगितले.
