✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ तालुक्यातील विजेबाबत विविध समस्या सोडविण्यासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आणि कुडाळ तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची कुडाळ तालुका बैठक आज दुपारी ३ वाजता अनंत मुक्ताई हॉटेल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत गणेश चतुर्थीच्या काळात वीज खंडित होऊ नये आणि ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व्हावा याबाबत वीज वितरणला निवेदन देण्यात येणार आहे. तसेच महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार असून एकमताने निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील विजेसंदर्भातील समस्या समजून घेणे तसेच या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी तालुका कार्यकारिणी गठीत करणे, तालुक्यातील विविध भागातील वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ठोस भूमिका घेण्यात येणार आहे. तसेच बैठकीच्या उत्तरार्धात वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. जिल्ह्यातील वीज समस्या सोडविणे, वीज ग्राहकांना न्याय देणे हा या संघटनेचा हेतू असल्याने विजेबाबत तक्रार असलेले नागरिक, संघटनेचे पदाधिकारी तसेच वीज ग्राहक संघटनेच्या तालुका व जिल्हा कार्यकारिणीत काम करु इच्छिणाऱ्या कुडाळ तालुक्यातील नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व समन्वयक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page