▪️आम्हाला वस्तुरूपी लाभ नको थेट,रक्कम खात्यात जमा करा..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना देण्यात येणारे विविध वस्तूरुपी लाभ हा बंद करून केंद्र सरकारच्या धोरणानुसार लाभाची रक्कम कामगारांच्या बँक खाती जमा करा. या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बांधकाम कामगार महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने हजारो बांधकाम कामगार एकवटून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघाचे अध्यक्ष भगवान साटम, सचिव हेमंत कुमार परब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

कामगारांना देण्यात येणारे बोगस सुरक्षा किट बंद करा, बोगस आरोग्य तपासणी बंद करा, घरेलू कामगार मंडळ सुरू करा, नोंदीत कामगारांना वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन द्या. बांधकाम कामगारांना वस्तूरुपी देण्यात येणारे लाभ बंद करून त्या ऐवजी लाभाची रक्कम कामगारांच्या बँक खाती जमा करा. अशा गगनभेदी घोषणा देत जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी बारा वाजता धडकला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी अध्यक्ष भगवान साटम मोर्चाला संबोधित करताना म्हणाले, सद्यस्थितीत बांधकाम कामगार मंडळ हे कामगारांच्या कल्याणासाठी २५ योजना तयार करून बनविण्यात आले आहे. मात्र आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत प्रत्यक्ष आर्थिक लाभाच्या योजना बंद करून केवळ वस्तूरूपी लाभ दिले जात आहेत. यामुळे बांधकाम कामगारांना प्रत्यक्ष आर्थिक लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. अद्यापही अनेक कामगार बांधकाम कामगार मंडळाचे सदस्य होऊ शकलेले नाहीत. अपूरी व्यवस्था आणि सरकारच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार यामुळे कामगारांना लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत. आरोग्य तपासणी व सुरक्षा संच वाटप च्या नावाखाली मंडळाचा निधी संपवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बोगस व मंडळाच्या पैशाची लूट करणाऱ्या योजना थांबविणे गरजेचे आहे. यासाठीच आजचा हा मोर्चा असून शासनाने याची दखल घ्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page