✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
दाभोली-वायंगणी रस्त्यावर भेडले माडाचे झाड तुटून दुसऱ्या झाडावर लटकलेल्या अवस्थेत आहे. या घटनेला तीन दिवस उलटले तरी स्थानिक प्रशासन निद्रिस्त आहे. संबंधित रस्त्यावरून वाहतूक असून वाऱ्यासोबत ते झाड रहदारीच्या वेळी खाली कोसळल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे संबंधित झाड अर्ध्यावरून तुटले. मात्र दुसऱ्या झाडाचा आधार मिळाल्यामुळे ते रस्त्याच्या मधोमध तसेच लटकलेल्या अवस्थेत राहिले. परिणाम त्या ठिकाणावरून जाणारे नागरिक व वाहन चालक जीव मुठीत घेऊन जात आहेत. मात्र या प्रकाराला तीन दिवस उलटले तरी स्थानिक प्रशासन निद्रिस्त असल्याचे दिसत आहे. तर याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला कल्पना देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर निवडणुकीच्या वेळी उंबरठा झिजवणारे लोकप्रतिनिधी आज कुठे आहे? असा संतप्त सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तरी जीवितहानी होण्यापूर्वी संबंधित झाड तात्काळ हटविण्यात यावे, अन्यथा त्या ठिकाणी दुर्घटना घडल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
