सिंधुदुर्ग /-
कोकणातील विविध प्रश्नांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी कोकणातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत माजी पालकमंत्री आ.दीपक केसरकर, व आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भातील बैठकीबाबत आ.वैभव नाईक यांनी विचारणा केली.त्यावर लवकरच ही बैठक घेऊन शासकीय मेडिकल कॉलेजला चालना देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केले.
आ.वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज होणे गरजेचे आहे.जेणेकरुन सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणत्याच आजार साथरोग प्रसंगी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. सध्यस्थीतीत आहे त्या आरोग्य सुविधांचा वापर करून जिल्ह्यात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.परंतु शासकीय मेडिकल कॉलेज ही जिल्ह्याची गरज आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले
तसेच आ.दीपक केसरकर, व आ.वैभव नाईक यांनी बांदा ते चांदा योजनेच्या ऐवजी प्रस्तावित असलेली सिंधू-रत्न योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी केली. तसेच एस. आर.अंतर्गत रस्ते दुरुस्तीचा कार्यक्रम घेऊन निधी देण्याची मागणी करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त पदांबाबत चक्राकार पध्दतीने पदभरती घेण्याची मागणी करण्यात आली.सीआरझेड जनसुनावणी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी ज्या अटी शिथिल करण्याची मागणी केली त्याचा विचार करून पुनरआराखडा व्हावा. समुद्री उधानांमुळे किनारपट्टी भागात जमीनीची धूप होत असून धुप्रतिबंधक बंधारे मंजूर करावेत.त्याचप्रमाणे घरबांधणी परवानगीचे अधिकार ग्रा.प.कडे देण्याबाबत निर्णय झालेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नसून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करून घरबांधणी परवानगीचे अधिकार पूर्ववत ग्रा.प कडे देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.या सर्व बाबींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच संबंधित विभागाच्या बैठका घेऊन हे विषय मार्गी लावणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब,मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद नार्वेकर ,उर्जा विभाग प्रधान सचिव असीम गुप्ता, मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव आशीषकुमार सिंग, मुख्यमंत्री प्रधान सचिव विकास खारगे,सल्लागार सचिव अजय मेहता, आदी उपस्थित होते.