✍🏼लोकसंवाद /- पुणे.

पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना दक्ष वाहतुक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी ३ कोटी ४२ लाख रु नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रेझा कारमधून पकडल्याची प्राथमिक माहिती आहे.सकाळी सात वाजेपर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरु होते. गुन्हे शाखा, हडपसर पोलिस तसेच वाहतुक पोलिसांच्या मदतीने ही कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. याबरोबर नोटा मोजण्याची मशीनही पोलिसांनी जप्त केली. यावेळी प्रशांत धनपाल गांधी (वय 47) रा. लासुर्णे. ता. इंदापूर जि. पुणे यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.

शहरात वाहतुक पोलिस तसेच स्थानिक पोलिसांच्यावतीने नाकाबंदी करण्यात येत आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वाहतुक विभागातील कर्मचारी शेवाळवाडी परिसराजवळ असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ संशयीत वाहनांची तपासणी करत असताना त्याला एक व्यक्ती आणि एक महिला संशयास्पदरित्या ब्रीझा कारमधून येताना दिसली. त्याने लागलीच कार थांबवून गाडीची तपासणी केली असता त्याला गाडीच्या मागील डिक्कीत संशायास्पदरित्या बॅगा दिसून आल्या.त्याने बॅगेच्या चैनी उघडून पाहिल्या असता बॅगेत मोठया प्रमाणावर नोटांचे बंडल असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवल्यानंतर गुन्हेशाखेच्या कर्मचाऱ्यांसह हडपसर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ब्रीझा कार हडपसर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. घटनेची गांभिर्य पाहता गुन्हे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी स्वत: गांधी याच्याकडे विचारपूस केल्यानंतर गांधीकडून ही व्यावसायीक रक्कम असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान नोटांच्या बॅगा असलेल्या गाडीला एका पिस्तुलधारी पोलिसाची सुरक्षा लावण्यात आली.

मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रोकड असलेल्या विमल गुटखा नाव असलेल्या चार बँगा व त्याबरोबर छोट्या मोठ्या बॅगा पंचनामा करण्यासाठी गाडीतून बाहेर काढण्यात आल्या. यावेळी नोटांच्या काही छोट्या बॅगा ब्रीझा कारच्या मधल्यासीट खाली देखील लपवून ठेवण्यात आल्या होत्या त्या बॅगा गांधी याने पोलिसासमक्ष काढून दिल्या. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी बॅगा रोकड मोजण्यासाठी पोलिस ठाण्याच्या आत नेण्यात आल्या. सकाळी ७ वाजेपर्यंत पोलिसांकडून नोटा मोजण्याचे काम सुरू होते. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का, का ह्या नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या का त्या अनुषंगाने पाेलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीवरून ८ मे रोजी संध्याकाळी १० वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखा, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा युनिट 5 यांनी संशयित ब्रेझा कार ताब्यात घेऊन सदरचे वाहन आणि संशयित व्यक्तीस हडपसर पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर पंचनामा करून वाहनात मिळून आलेल्या बॅगा तपासून त्यामध्ये एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये मिळून आले. या व्यक्तीकडे कसून चौकशी केली असता सदरची रक्कम त्याच्या राहत्या घरातून पुणे येथील महाराष्ट्र बँक मुख्य शाखा, लक्ष्मीरोड येथे कर्जापोटी भरायची होती असे सांगत आहे. याबाबत सी आर पी सी कलम 41(D) अन्वये हडपसर पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली असून आयकर विभाग पुणे यांना पुढील कारवाई करणेबाबत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page