✍🏼लोकसंवाद /-दोडामार्ग.

हत्ती अंगावर धावून आल्यामुळे केर गावचे माजी सरपंच तथा शिंदे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई जखमी झाले आहेत.ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास केर येथे घडली. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत हत्तीचे संकट दोडामार्ग तालुक्यात भेडसावत आहे. केर गावात हे हत्ती स्थिरावले आहेत. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास हत्ती शेती बागायतीच्या जवळ आल्यामुळे वनविभागाच्या समवेत काही ग्रामस्थ त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यात श्री देसाई सहभागी झाले होते. मात्र अचानक हत्ती अंगावर धावून आल्यामुळे प्रेमानंद देसाई हे त्या ठिकाणी धावताना पडले. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page