वाढदिवस अभिष्टचिंतन!
💐💐💐💐💐💐💐💐
“मी एक शून्य” म्हणत सतत सगळ्या आत्मप्रौढीपासून दूर राहणे पसंत करणारे व्यक्तिमत्त्व न सांगताही महान होऊन जाते. कारण शून्यातून निर्माण केलेल्या आपल्या विश्वाची ताकद एखाद्या ध्येयाच्या मागे उभी करणे, आणि ती ही निरपेक्षपणे हे अजिबात सोपे काम नाही. असं आयुष्य जगणाऱ्या आणि जगायला शिकवणाऱ्या एका अद्भुत माणसाचा आज वाढदिवस आहे. या अजेय कर्तृत्वाचे नाव आहे – अजय अशोक शिरसाट!
अजय हे जसे माझे, तसेच अनेकांचे जीवलग मित्र! कारण स्वतःचे अस्तित्व झाकत प्रत्येकाच्या पाठीशी शून्य होऊन राहणे हा अजय शिरसाट यांचा सहज स्वभाव आहे. हे शून्य ज्याच्या पाठीशी असेल त्याची किंमत मात्र नक्कीच वाढते. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी… भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी…असं विंदा करंदीकर म्हणाले होते, त्यातच भर टाकत “मैत्रीच्या विश्वामधली विश्वासाची साथ घ्यावी” अशी पंक्ती अजय शिरसाट यांच्याबाबतीत अनेकदा अनेकांना अनुभवायला मिळते. अडचणीतल्या कोणालाही मदत करण्याचे आणि ती ‘कृष्णार्पणमस्तू’ म्हणत विसरून जायची या घरच्या संस्कारातून अजय शिरसाट घडत गेलेत. आयुष्यात खडतर कष्ट भोगले, संघर्ष केला तरीही या संस्काराची पुंजी मात्र त्यांनी नेहमीच जपली आहे.
महायोद्धा कर्णाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एक दिवस केशकर्तनकार कर्णाची दाढी करत असताना त्याची नजर कर्मासमोरच्या सोन्याच्या वाटीवर खिळली. ते नक्षीमय पात्र त्याला प्रचंड आवडलं. कर्णाच्या ते लक्षात येताच डाव्या हाताकडची ती वाटी त्याने डाव्या हातानेच त्याला दान केली. केशकर्तनकार म्हणाला, महाराज, दान नेहमी उजव्या हाताने द्यावे असे संकेत आहेत! कर्ण उत्तरला – माझा नियम आहे, की दान करताना त्याची प्रसिद्धी करू नये, अगदी डाव्या हाताने केलेले दान उजव्या हातालाही कळता कामा नये!
अजय शिरसाट यांच्यावर कर्णाचा हा प्रभाव राहिला. कोणालाही मदत करताना, दान करताना आपले नाव व्हावे, आपला फोटो झळकावा अशी अपेक्षा त्यांनी कधीही केली नाही. कोरोनाचा कठीण कालावधी अनेकांची खडतर परीक्षा घेणारा होता, अनेकांच्या आयुष्याची घडी त्यात बिघडून गेली होती. या काळात अजय शिरसाट यांनी केलेले मदतकार्य फार मोठे होते, पण त्याची जाहिरात कुठेही केली गेली नाही. कदाचित, आजच्या झगमगाटी प्रसिद्धीवरच जिथे नेतृत्व ठरवले जाते, या काळात ही गोष्ट त्यांच्यातल्या युवा नेतृत्वासाठी घातक ठरण्याचीच जास्त शक्यता आहे. काळाप्रमाणे त्यांना बदलावे लागेल हा आम्हा मित्रपरिवाराचा नेहमीच आग्रह राहिला आहे, पण.. आजपर्यंत त्यात आम्हाला यश मिळालेलं नाही. आजही तळागाळात काम करणे आणि प्रसिद्धीपासून दूर राहणे या गोष्टी त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होऊन बसलेल्या आहेत.
कदाचित भलेही लहानपणी मनासारखे आयुष्य वाट्याला आले नाही, तरीही आयुष्य मनासारखे जगल्यावर जी एक उर्मी मिळते, आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते तीच अजय शिरसाट यांच्या व्यक्तिमत्त्वातली जादू असावी. कारण एकीकडे सामाजिक भावनेतून कार्यकर्ता बनून तळागाळात वावरायचे, मदतीचा हात सतत पुढे करायचा आणि दुसरीकडे, एक यशस्वी बिल्डर म्हणून नावलौकिक प्राप्त करायचा, त्यात काटेकोर नियम आणि ग्राहकांची विश्वासार्हता जिंकत व्यावसायिक यशाची नवनवी क्षितिजे गाठायची, हा विरोधाभास तसा दुर्मिळच! कुडाळमधले मेगा आकर्षण म्हणजे ‘छत्रपती शिवाजी पार्क’ हा भव्य आणि आधुनिक संकुलप्रकल्प. कोरोनामधल्या सगळ्या प्रतिबंधांशी झगडत त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. इथे त्यांच्यातला संघर्षातून आव्हानांशी भिडणारा आणि यश खेचून आणणारा ‘योद्धा उद्योजक’ दिसून आला.
अर्थात, हा योद्धा काही कोरोनातच घडला नव्हता, तर लहानपणापासूनच संघर्षाशी झुंजत उभा राहिलेला होता. बालपणापासून खुप हुशार, चपळ, खेळ आणि अभ्यासाची सारखीच आवड असणारा डेअरिंगबाज ‘फास्टर फेणे’ हीच अजयची ओळख होती. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले आणि आव्हाने त्याची मित्रमंडळी बनली. आईसोबत समादेवी मंदिर येथे रस्त्यावर मसाला विकण्याचा व्यवसाय त्याची व्यावसायिक बैठक पक्की करून गेला. लहानपणापासून मैदानी खेळ, व्यायाम याची असलेली आवड अजयच्या पावलांना आपोआपच संघाच्या शाखेकडे घेऊन गेली. पाचव्या इयत्तेपासून संदीप शिंदे, मंदार गोगटे आदी संघसोबत्यांपासून सुरू झालेला परिचय पुढेही रा.स्व.संघाशी नाते वाढवत गेला. त्याच दरम्यान, आठवीपासून काकांचा पिग्मी-कलेक्शनचा व्यवसाय सांभाळायला अजयने सुरुवात केली, ज्यातून व्यापारी जगताची अजयला ओळख होत गेली, जवळीक होत गेली. मनात व्यावसायिकतेचे बीज होतेच, त्या बीजाला हळूहळू खतपाणी मिळत होते.
पुढे महाविद्यालयीत दशेत साधारणत: १९९५ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम अजयने सुरू केले. डॉ. अभय सावंत, भास्कर साधले, लालजी पागी, अप्पा लुडबे यांच्या मार्गदर्शनाने कुडाळमध्ये चांगले काम अजयने उभे केले. दोन वर्ष संघटना वाढीसाठी झोकून देत काम केले. १९९७ मध्ये अभविपतर्फे “खेळीयाड” हा जिल्ह्यास्तरीय प्रचंड मोठा कार्यक्रम कुडाळमध्ये घेण्यात आला होता. कार्यक्रमाचे आव्हान मोठे होते, आणि अध्यक्षपदाची जबाबदारी अजयच्या खांद्यावर होती. अर्थात, नेहमीप्रमाणेच जीवतोड मेहनत घेत हा कार्यक्रम अजयने यशस्वी करून दाखवला. रचनात्मक आणि संघर्षात्मक अशा दोन्ही क्षेत्रात अजय शिरसाट या युवानेतृत्वाचा ठसा उमटत चालला होता. विविध उपक्रम यशस्वी होत होते, ओरोस येथील रस्तारोको आंदोलनात नेतृत्व करत प्रसंगी अंगावर गुन्हे घेत संघर्ष चाललेला होता. पुढे शिक्षणासाठी मुंबईला जावे लागले आणि या प्रवासाची दिशा काहीशी बदलली. पुढच्या काळात राष्ट्रीय विचारधारेचा हा प्रवाह आणि प्रवास भाजपाच्या दिशेने खळाळत राहिला. भाजप कुडाळ शहर प्रमुख म्हणून झालेली नेमणूक सुद्धा तितक्याच प्रभावीपणे पार पाडली. सिंधूदुर्गात भाजपा तेव्हा फारसा रुजला नव्हता. तेव्हाही, राजु राऊळ, बंड्या सावंत यांच्यासारखे धडपडे सहकारी सोबत घेत पहिल्या दोन दिवसात १०० सदस्य मिळवत कामाची दणकेबाज सुरुवात केली. ग्रासरूटवर मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम करण्यातून अजय शिरसाट हे मा.सुरेशजी प्रभू, रविंद्रजी चव्हाण यांच्या नेहमीच फार जवळ राहिले.
मुंबईतल्या नव्या पर्वात, विप्रो सर्टिफाईड हार्डवेअर इंजिनिअर होऊन अजय शिरसाट हे कॉम्पॅक कंपनीत सिनियर इंजिनियर बनले. वेगळ्या क्षेत्रात कारकीर्द चमकायला लागली. पण गावाकडची माती आणि नाती पुन्हा साद घालू लागली. गावी येऊन “माय कॉम्प्युटर” नावाने कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेसचे शॉप सुरू केले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा या विभागात खाजगी आणि शासकीय कार्यालयात कामाचे क्षेत्र विस्तारत नेले. अजय शिरसाट म्हणजेच विश्वासार्हतेचे दुसरे नाव बनत गेले. लोकसभा व विधानसभा निवडूणुकामध्ये १०० पेक्षा जास्त व्हिडीओग्राफर नेमत आचारसंहितेच्या कामात एकदा नव्हे, तर सतत तीन निवडणुकांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक झाले.
तरीही… अजय शिरसाट या उद्योजकाचे समाधान होत नव्हते. मनातले क्षितिज खुणावत होते.
लहानपणापासून उंच इमारतींचे आकर्षण होते. त्यातून बिल्डिंग व्यवसायाची आवड निर्माण झाली. २०१४ साली बिल्डिंग व्यवसायात पदार्पण केले. आज कुडाळमधील सर्वात भव्य दिव्य प्रकल्प साकारत अजय शिरसाट यांनी नव्या कार्यक्षेत्रात तेवढ्याच ताकदीने ठसा उमटवला आहे.
आज, कोणतीही प्रसिद्धी टाळत गेले तरीही अजय शिरसाट नावाचा हिरा समाजात स्वयंतेजाने चमकतच राहिला. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत गेला.
आज आपल्या घरट्यात पत्नी आर्या, आर्यन आणि ओवी ही मुले, आई आशा, भाऊ संजय, मेहुणा राजाराम उर्फ आबा धारगळकर अशा परिवारासह अजय शिरसाट सुखी आणि समाधानी आहेत. पण या घरट्याबाहेरही त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा त्यांचा फार मोठा मित्रपरिवार आहे. या सर्वांच्या प्रेमाच्या बळावर भविष्यातही त्यांची गरुडझेप अशीच विस्तारत राहील. क्षितिज छोटे होत जाईल… मन मोठे आहेच, त्यातून समाजसेवेच्या क्षेत्रातही ते असेच विहरत राहील.
शून्यातून विश्व साकारणाऱ्या आमच्या या जीवलग मित्राला हृदयापासून कोटी कोटी शुभेच्छा! जीवेत शरद: शतम् अजयजी, जुग जुग जियो!!!
