✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील सात बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत. तर एका दुकानाच्या दरवाजाचा कडी कोयंडाही तोडला आहे. यातील चार ठिकाणी बुधवारी तर चार ठिकाणी गुरुवारी रात्री चोरीचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान सर्व बंगले बंदस्थितीमधील असून त्यांचे मालक बाहेरगावी गेले होते. मात्र, या घटनेत काहीही मुद्देमाल चोरीस गेलेला नाही. कलमठ बिडयेवाडी परिसरातील एका बंगल्याची देखभाल करणारी व्यक्ती त्या बंगल्याकडे गेली असता या घरफोड्या उघडकीस आल्या.
चोरट्यांनी बंगल्यांच्या प्रवेशद्वारासह मुख्य दरवाजाची कुलपे व कडी कोयंडे तोडले. काही बंगल्यात त्यांना प्रवेश करता आलेला नाही. तर एका बंगल्यात प्रवेश करीत तेथील कपाटे व अन्य सामान अस्ताव्यस्त करून टाकले होते. मात्र, तेथेही काहीही चोरीस गेलेले नाही. घटनास्थळी बंगल्यांची फोडलेली कुलपेही दिसून आली. गुरुवारी घटनेची माहिती समजताच कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, हवालदार राजेंद्र नानचे, पोलिस शिपाई किरण कदम यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तर शुक्रवारी सायंकाळी उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, माने यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी कलमठ ग्रामपंचायत सदस्य पप्पू यादव, कोरगावकर आदी उपस्थित होते. बाहेरगावी असलेल्या बंगल्यांच्या मालकांशीही पोलिसानी संपर्क साधला. मात्र, त्यापैकी कोणीही शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत •असून त्या परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.